श्रीशिवलीलामृत अध्याय तेरावा
ग्रंथ - पोथी > शिवलीलामृत Posted at 2018-12-04 05:54:01
श्रीशिवलीलामृत अध्याय तेरावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
जो सद्गुरु ब्रह्मानंद ॥ अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ॥ स्मरारि गजास्यजनक प्रसिद्ध ॥ चरणारविंद नमू त्याचे ॥१॥
स्कंदपुराणी सूत ॥ शौनकादिकांप्रति सांगत ॥ त्रेतायुगी अद्भुत ॥ कथा एक वर्तली ॥२॥
दक्षप्रजापति पवित्र ॥ आरंभिता झाला महासत्र ॥ निंदोनि स्वामी त्रिनेत्र ॥ सर्व निर्जर बोलाविले ॥३॥
जगदात्मा सदाशिव ॥ जयासी वंदिती पद्मज रमाधव ॥ आम्नाय आणि वासव ॥ स्तविती ज्यासी सर्वदा ॥४॥
शिवमहिमा नेणोनि अद्भुत ॥ दिवसनिशी दक्ष निंदीत ॥ नरमुंडमाळा अपवित्र बहुत ॥ गळा घालित कैसा हा ॥५॥
करी ओले गजचर्म प्रावरण ॥ न कंटाळे दुर्गंधीने मन ॥ भिक्षा मागे नरकपाळ घेऊन ॥ वसे स्मशानी सर्वदा ॥६॥
चिताभस्म अंगी चर्चिले ॥ विखार ठायी ठायी वेष्टिले ॥ भ्रष्ट तितुके अंगिकारिले ॥ सवे पाळे भूतांचे ॥७॥
अभद्र तितुके अंगिकारिले ॥ यासी कोण म्हणतील भले ॥ ज्यासी जे योग्य नाही बोलिले ॥ ते दिल्हे येणे सर्वस्वे ॥८॥
यासी देव म्हणेल कोण ॥ क्रोधे संतप्त अनुदिन ॥ तृतीय नेत्री प्रळयाग्न ॥ वाटे त्रिभुवन जाळील ॥९॥
मस्तकी वाहे सदा पाणी ॥ नाचत जाऊन निजकीर्तनी ॥ भक्त देखता नयनी ॥ बैसे अवघे देवोनि ॥१०॥
दैत्यांसी देवोनिया वर ॥ येणेचि माजविले अपार ॥ न कळे यासी लहान थोर ॥ वाहन ढोर तयाचे ॥११॥
शिवनिंदा करावया कारण ॥ एकदा दक्ष गेला कैलासालागून ॥ शिवे नाही दिधले अभ्युत्थान ॥ तेणे दुःखे क्षोभला ॥१२॥
ऐसा दक्ष शिवासी निंदी ॥ यज्ञी न पूजी विभाग नेदी ॥ पुरली आयुष्याची अवधी ॥ तरीच हे बुद्धि उपजली ॥१३॥
शिवभजन न करी जो पतित ॥ त्यावरी विघ्न पडती असंख्यात ॥ याग जप तप दान व्यर्थ ॥ उमानाथ नावडे जया ॥१४॥
जेणे निंदिला शिवदयाळ ॥ परम निर्दय तो दुर्जन खळ ॥ मनुष्यांमाजी तो चांडाळ ॥ त्याचा विटाळ न व्हावा ॥१५॥
असो दक्षकन्या दाक्षायणी ॥ कैलासी वाट पाहे भवानी ॥ म्हणे याग मांडिला पितृसदनी ॥ मज बोलावू नये का ॥१६॥
अपर्णा म्हणे त्रिनेत्रा ॥ मी जाईन पित्याच्या सत्रा ॥ तेणे सर्व कन्या पंचवक्रा ॥ सन्मानेसी बोलाविल्या ॥१७॥
मज विसरला काय म्हणोन ॥ तरी मी तेथवरी जाईन ॥ यावरी बोले भाललोचन ॥ मृडानीप्रति तेधवा ॥१८॥
म्हणे मृगलोचने ऐक गौरी ॥ पद्मजजनकसहोदरी ॥ लावण्यामृतसरिते अवधारी ॥ कदाही तेथे न जावे ॥१९॥
तव पिता निंदक कुटिल ॥ मम द्वेषी दुर्जन खळ ॥ तू जाताचि तात्काळ ॥ अपमानील शुभानने ॥२०॥
ज्याच्या अंतरी नाही प्रीती ॥ त्याचे वदन न पहावे कल्पांती ॥ ऐसे त्र्यंबक बोले अंबिकेप्रती ॥ नारद तेथे पातला ॥२१॥
म्हणे पितृसदना जावयालागून ॥ न पहावा कदाही मान ॥ नंदीवरी आरूढोन ॥ दाक्षायणी चालिली ॥२२॥
सवे घेतले भूतगण ॥ मनोवेगे पातली दक्षसदन ॥ तव मंडप शोभायमान ॥ ऋषी सुरवरी भरला असे ॥२३॥
आपुलाल्या पूज्यस्थानी ॥ देव बैसविले सन्मानेकरूनी ॥ एक सदाशिव वेगळा करूनी ॥ पूजीले ऋषि सुरवर ॥२४॥
जैसा उडुगणात मिरवे अत्रिसुत ॥ तैसा दक्ष मध्ये विराजत ॥ शिवद्वेषी परम अभक्त ॥ कुंडी टाकीत अवदाने ॥२५॥
भवानी जवळी आली ते वेळे ॥ देखोनि सुरवर आनंदले ॥ परी दक्षाचे धुरे डोळे भरले ॥ कन्येकडे न पाहेचि ॥२६॥
नंदिवरूनि उतरूनी ॥ पितयासमीप आली भवानी ॥ दक्ष मुख मुरडोनी ॥ घाली ग्रंथी भ्रूमंडळा ॥२७॥
जगन्माता गुणनिधान ॥ न्याहाळूनि पाहे पितृवदन ॥ म्हणे धुरे भरले नयन ॥ म्हणोनि न पाहे मजकडे ॥२८॥
सकळ भगिनींचा सन्मान बहुत ॥ दाक्षायणी तेव्हा देखत ॥ जननीकडे विलोकीत ॥ तेही न पाहे तियेते ॥२९॥
मनात दक्ष भावीत ॥ ईस कोणे बोलाविले येथ ॥ कन्या आणि जामात ॥ दृष्टी मज नावडती ॥३०॥
आदिमाया प्रवणरूपिणी ॥ अनंतब्रह्मांडांची स्वामिणी ॥ तिचा अपमान देखोनि ॥ भ्याले सकळ सुरवर ॥३१॥
म्हणती दक्ष भुलला यथार्थ ॥ हे ब्रह्मांड जाळील निमिषांत ॥ अपमान देखोनि उमा तेथ ॥ क्रोधे संतप्त जाहली ॥३२॥
प्रळयवीज पृथ्वीवरी पडत ॥ तैसी उडी घातली कुंडात ॥ उर्वीमंडळ डळमळत ॥ होय कंपित भोगींद्र ॥३३॥
वैकुंठ कैलास डळमळी ॥ कमळभवांडी हाक वाजली ॥ कृतांत काप चळचळी ॥ म्हणे बुडाली सृष्टि आता ॥३४॥
हाक घेवोनी शिवगण ॥ गेले शिवापाशी धावोन ॥ सांगती सर्व वर्तमान ॥ जे जे जाहले दक्षगृही ॥३५॥
ऐकता क्षोभला उमाकांत ॥ जेवी महाप्रळयींचा कृतांत ॥ हाक देवोनि अद्भुत ॥ जटा आपटीत आवेशे ॥३६॥
तो अकस्मात वीरभद्र ॥ प्रगटला तेथे प्रळयरुद्र ॥ वाटे प्रलयाग्नि आणि द्वादश मित्र ॥ एकत्र होवोनि प्रगटले ॥३७॥
वाटे त्याचिया तेजांत ॥ चंद्रसूर्य बुचकळ्या देत ॥ आकाश असे आसुडत ॥ सडा होत नक्षत्रांचा ॥३८॥
कुंभिनी बुडाली देख ॥ चतुर्दश लोकी गाजली हाक ॥ दक्षगृही बलाहक ॥ रक्तवर्षाव करीतसे ॥३९॥
अवचित उकलली क्षिती ॥ दिवसा दिवाभीते बोभाती ॥ दक्षअंगीची सर्व शक्ती ॥ निघोनी गेली तेधवा ॥४०॥
इकडे वीरभद्र शिवस्तवन ॥ करोनि निघाला क्रोधायमान ॥ एकवीस पद्मे दळ घेऊन ॥ मनोवेगे धांविन्नला ॥४१॥
साठ कोटि गण घेऊन ॥ मागूनि धांविन्नला अपर्णाजीवन ॥ पुढे शिवपुत्र धावोन ॥ ख्याती केली दक्षयागी ॥४२॥
वारणचक्र असंभाव्य ॥ त्यावरी एकला लोटे कंठीरव ॥ की विनायके घेतली धाव ॥ अपार अही पाहोनी ॥४३॥
आला देखोनि वीरभद्र ॥ पळो लागले देव समग्र ॥ अवदाने सांडोनि सत्वर ॥ ऋत्विज पळाले तेथोनिया ॥४४॥
आकांतला त्रिलोक ॥ प्रळयकाळींचा पावक ॥ दुमदुमिला ब्रह्मांडगोळक ॥ शक्रादिदेव कापती ॥४५॥
एक मलमूत्र भये विसर्जिती ॥ धोत्रे गळाली नेणती क्षिती ॥ कुक्कुटरूपे रोहिणीपती ॥ पळता झाला तेधवा ॥४६॥
शिखी होवोनिया शिखी ॥ पळता झाला एकाएकी ॥ यम आपुले स्वरूप झाकी ॥ बकवेष घेवोनिया ॥४७॥
नैऋत्यपति होय काक ॥ शशक होय रसनायक ॥ कपोत होवोनिया अर्क ॥ पळता झाला तेधवा ॥४८॥
कीर होवोनि वृत्रारी ॥ पळता भय वाटे अंतरी ॥ नाना पक्षिरूपे झडकरी ॥ नवग्रह पळाले ॥४९॥
मिंधियावरी वीज पडत ॥ दक्षावरी तेवी अकस्मात ॥ महावीर शिवसुत ॥ वीरभद्र पातला ॥५०॥
षड्बाहु वीर दैदीप्यमान ॥ असिलता खेटक धनुष्य बाण ॥ त्रिशूळ डमरू शोभायमान ॥ सायुध ऐसा प्रगटला ॥५१॥
पूषाचे पाडिले दात ॥ भगदेवाचे नेत्र फोडीत ॥ खांड मिशा उपडीत ॥ ऋत्विजांच्या तेधवा ॥५२॥
चरणी धरूनि आपटिले ॥ बहुतांचे चरण मोडिले ॥ कित्येकांचे प्राण गेले ॥ वीरभद्र देखता ॥५३॥
मागूनि पातला शंकर ॥ तेणे दक्षपृतना मारिली सत्वर ॥ कुंडमंडप समग्र ॥ विध्वंसूनि जाळिला ॥५४॥
देखोनिया विरूपाक्ष ॥ भयभीत झाला दक्ष ॥ पद्मज आणि सहस्त्राक्ष ॥ पूर्वीच तेथोनि पळाले ॥५५॥
वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा ॥ त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा ॥ तुज लावीन आता शिक्षा ॥ शिवद्वेषिया पाहे पा ॥५६॥
विद्युत्प्राय असिलता तीव्र ॥ ऊर्ध्वहस्ते महावीर ॥ छेदिता झाला दक्षशिर ॥ प्रळय थोर जाहला ॥५७॥
दक्षशिर गगनी उसळले ॥ वीरभद्रे पायातळी रगडिले ॥ मग उमाधवापाशी ते वेळे ॥ देव पातले चहूकडोनी ॥५८॥
सकळ सुरांसहित कमळासन ॥ करीत उमावल्लभाचे स्तवन ॥ म्हणे वृषभध्वजा कृपा करून ॥ दक्षालागी उठवी ॥५९॥
संतोषोनि कर्पूरगौर ॥ म्हणे आणोनि लावा दक्षाचे शिर ॥ परी ते नेदी वीरभद्र ॥ पायातळी रगडिले ॥६०॥
म्हणे शिवद्वेषी दुराचार ॥ त्याचा करीन ऐसा संहार ॥ जो शिवनाम न घे अपवित्र ॥ जिव्हा छेदीन तयाची ॥६१॥
जो न करी शिवार्चन ॥ त्याचे हस्त चरण छेदीन ॥ जो न पाहे शिवस्थान ॥ त्याचे नयन फोडीन मी ॥६२॥
विष्णु थोर शिव लहान ॥ हर विशेष विष्णु सान ॥ ऐसे म्हणे जो खळ दुर्जन ॥ संहारीन तयाते ॥६३॥
सर्वथा नेदी मी दक्षशिर ॥ काय करितील विधिहरिहर ॥ मग मेषशिर सत्वर ॥ दक्षालागी लाविले ॥६४॥
सजीव करोनिया दक्ष ॥ तीर्थाटन गेला विरूपाक्ष ॥ द्वादश वर्षे निरपेक्ष ॥ सेवीत वने उपवने ॥६५॥
महास्मशान जे आनंदवन ॥ तेथे शंकर राहिला येऊन ॥ मग सहस्त्र वर्षे संपूर्ण ॥ तपासनी बैसला ॥६६॥
पुढे हिमाचलाचे उदरी ॥ अवतरली त्रिपुरसुंदरी ॥ शिवआराधना नित्य करी ॥ हिमाचळी सर्वदा ॥६७॥
हिमनगाची स्त्री मेनका ॥ तीस पुत्र झाला मैनाकपर्वत देखा ॥ पार्वती कन्या जगदंबिका ॥ आदिमाया अवतरली ॥६८॥
ब्रह्मांडमंडपामाझारी ॥ जिची प्रतिमा नाही दूसरी ॥ कमळजन्मा वृत्रारी ॥ त्यांसही दुजी करवेना ॥६९॥
तिचे स्वरुप पहावया ॥ येती सुर भुसुर मिळोनिया ॥ जिचे स्वरूप वर्णावया ॥ सहस्त्रवदना शक्ति नव्हे ॥७०॥
मृग मीन कल्हार खंजन ॥ कुरवंडी करावे नेत्रांवरून ॥ अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण ॥ चरणांगुष्ठी न तुळे जिच्या ॥७१॥
आकर्णनेत्र निर्मळ मुखाब्ज ॥ देखोनि लज्जित होय द्विजराज ॥ कंठीरव देखोनि जिचा माज ॥ मुख न दावी मनुष्या ॥७२॥
परम सुकुमार घनश्यामवर्णी ॥ ओतिली इंद्रनीळ गाळुनी ॥ दंततेज पडता मेदिनी ॥ पाषाण महामणी पै होती ॥७३॥
आदिमाया प्रणवरूपिणी ॥ ते झाली हिमनगनंदिनी ॥ अनंतशक्तींची स्वामिणी ॥ वेदपुराणी वंद्य जे ॥७४॥
कोट्यानुकोटी मीनकेतन ॥ सांडणी करावी नखांवरून ॥ आंगींचा सुवास संपूर्ण ॥ ब्रह्मांड फोडोन वरी जाय ॥७५॥
ब्रह्मादिदेव मुळीहूनी ॥ गर्भी पाळी बाळे तिन्ही ॥ बोलता प्रकाश पडे सदनी ॥ निराळवर्णी कोमलांगी ॥७६॥
सहज बोलता क्षिती ॥ वाटे रत्नराशी विखुरती ॥ पदमुद्रा जेथे उमटती ॥ कमळे उठती दिव्य तेथे ॥७७॥
त्या सुवासासी वेधोनि वसंत ॥ भोवता गडबडा लोळत ॥ केवळ कनकलता अद्भुत ॥ कैलासाहुनी उतरली ॥७८॥
नंदीसहित त्रिपुरारी ॥ येवोनि हिमाचळी तप करी ॥ शिवदर्शना झडकरी ॥ हिमनग येता जाहला ॥७९॥
घालोनिया लोटांगण ॥ करीत तेव्हा बहुत स्तवन ॥ यावरी पार्वती येऊन ॥ करीत भजन शिवाचे ॥८०॥
साठ सहस्त्र लावण्यखाणी ॥ सवे सवे सखिया जैशा पद्मिणी ॥ तयांसहित गजास्यजननी ॥ सेवा करी शिवाची ॥८१॥
द्वारी सुरभीपुत्र रक्षण ॥ ध्यानस्थ सदा पंचवदन ॥ लाविले पंचदशलोचन ॥ सदा निमग्न स्वरूपी ॥८२॥
तारकासुराचे पुत्र तिघेजण ॥ तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन ॥ तिही घोर तप आचरोन ॥ उमारमण अर्चिला ॥८३॥
सहस्त्रदळकमळेकरून ॥ त्रिवर्ग पूजिती त्रिनयन ॥ सहस्त्रांत एक न्यून ॥ कमळ झाले एकदा ॥८४॥
तिघेही काढूनि नेत्रकमळे ॥ शिवार्चन करिते झाले ॥ मागुती एक न्यून आले ॥ मग स्वशिरकमळे अर्पिली ॥८५॥
प्रसन्न होवोनि त्रिनेत्र ॥ तिघे उठविले तारकापुत्र ॥ तिघांसी दीधले अपेक्षित वर ॥ झाले अनिवार त्रिभुवनी ॥८६॥
तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनि ॥ त्रिपुरे दिधली अंतरिक्षगमनी ॥ दिव्य सहस्त्र वर्षे पाहता शोधोनी ॥ निमिषार्धे एक होती ॥८७॥
इतुक्यात जो धनुर्धर ॥ मारील लक्ष्य साधुनि शर ॥ त्रिपुरांसहित संहार ॥ तुमचा करील निर्धारे ॥८८॥
यावरी त्या तिघाजणी ॥ त्रिभुवन त्रासिले बळेकरूनी ॥ देव पळविले स्वस्थानाहूनी ॥ पीडिली धरणी बहु पापे ॥८९॥
मग देव ऋषि सकळ मिळोन ॥ वैकुंठपतीस गेले शरण ॥ गरुडध्वज सर्वांसी घेऊन ॥ शिवापाशी पातला ॥९०॥
करिता अद्भुत स्तवन ॥ परम संतोषला पंचवदन ॥ म्हणे मी झालो प्रसन्न ॥ मागा वरदान अपेक्षित ॥९१॥
म्हणती त्रिपुरे पीडिले बहुत ॥ देव ऋषि झाले पदच्युत ॥ शिव म्हणे पाहिजे रथ ॥ त्रिपुरमर्दनाकारणे ॥९२॥
तव देव बोलती समस्त ॥ आम्ही सजोनि देतो दिव्य रथ ॥ मग कुंभिनी स्यंदन होत ॥ चक्रे निश्चित शशिमित्र ॥९३॥
मंदरगिरी अक्ष होत ॥ स्तंभ झाले चारी पुरुषार्थ ॥ चारी वेद तुरंग बळवंत ॥ मूर्तिमंत पै झाले ॥९४॥
सारथी विधिहोत सत्वर ॥ लाविले शास्त्रांचे वाग्दोर ॥ पुराणे तटबंध साचार ॥ उपपुराणे खिळे बहु ॥९५॥
कनकाद्रि धनुष्य थोर ॥ धनुर्ज्या होत भोगींद्र ॥ वैकुंठीचा सुकुमार ॥ झाला शर तेजस्वी ॥९६॥
रथी चढता उमानाथ ॥ रसातळी चालिला रथ ॥ कोणासी न उपडे निश्चित ॥ मग नंदी काढीत श्रृंगाने ॥९७॥
मग स्यंदनी एक चरण ॥ दुजा नंदीवरी ठेवून ॥ अपार युद्ध करून ॥ त्रिपुरदळे संहारिली ॥९८॥
होता युद्धाचे घनचक्र ॥ वीरभद्रे संहारिले असुर ॥ परि अमृतकुंडे समग्र ॥ दैत्यांकडे असती पै ॥९९॥
अमृत शिंपिता अमित ॥ सजीव होती सवेचि दैत्य ॥ शिवे मेघास्त्र घालूनि समस्त ॥ अमृतकुंडे बुडविली ॥१००॥
अंतराळी त्रिपुरे भ्रमती ॥ लक्ष साधी मृडानीपती ॥ दिव्य सहस्त्र वर्षे झाली येचि रीती ॥ न लागती पाती कदापि ॥१॥
आंगी लोटला धर्मपूर ॥ ते हे भीमरथ गंगा थोर ॥ नेत्रींचे जलबिंदु पडता अपार ॥ रुद्राक्ष तेथे जाहले ॥२॥
दैत्यस्त्रिया पतिव्रता थोर ॥ तेणे असुरांसी जय अपार ॥ मग बौद्धरूपे श्रीकरधर ॥ दैत्यस्त्रियांत प्रवेशला ॥३॥
वेदबाह्य अपवित्र ॥ प्रगट केले चार्वाकशास्त्र ॥ पतिव्रताधर्म मोडोनि समग्र ॥ व्यभिचारकर्मे करविली ॥४॥
तेणे दैत्यांसी झाले अकल्याण ॥ तव इकडे शिवे लक्ष्य साधून ॥ धनुष्यी योजिला विष्णुबाण ॥ पाशुपतास्त्र स्थापुनी ॥५॥
उगवले सहस्त्र मार्तंड ॥ तैसे अस्त्र चालिले प्रचंड ॥ की उभारिला कालदंड ॥ संहारावया विश्वाते ॥६॥
की प्रळयाग्नीची शिखा सबळ ॥ की कृतांताची जिव्हा तेजाळ ॥ की ते प्रळयमेघांतील ॥ मुख्य चपळा निवडिली ॥७॥
की सप्तकोटीमंत्रतेज पाही ॥ एकवटले त्या अस्त्राठायी ॥ देव दैत्य भयभीत ह्रदयी ॥ म्हणती कल्पान्त मांडिला ॥८॥
न्याससहित जपोनि मंत्र ॥ सोडोनि दिधले दिव्यास्त्र ॥ नवखंडधरणी आणि अंबर ॥ तडाडले ते काळी ॥९॥
सहस्त्र विजा कडकडती ॥ तैसी धाविन्नली अस्त्रशक्ती ॥ भये व्यापिला सरितापती ॥ आंग टाकू पहाती दिग्गज ॥११०॥
देव विमाने पळविती ॥ गिरीकंदरी असुर दडती ॥ एक मूर्च्छना येवोनि पडती ॥ उठती ना मागुते ॥११॥
त्या अस्त्रे न लागता क्षण ॥ त्रिपुरे टाकिली जाळून ॥ त्यात तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न ॥ साह्य झाला तयाते ॥१२॥
तीन्ही ग्राम सेनेसहित ॥ त्रिपुरे भस्म झाली तेथ ॥ देव शिवस्तवन करीत ॥ चरण धरीत सप्रेमे ॥१३॥
त्यावरी त्रिपुरपिता तारकासुर ॥ तेणे प्रळय मांडिला थोर ॥ देव पळविले समग्र ॥ चंद्र सूर्य धरूनि नेले ॥१४॥
भागीरथी आदि गंगा पवित्र ॥ धरूनि नेत तारकासुर ॥ देवांगना समग्र ॥ दासी करोनि ठेविल्या ॥१५॥
ब्रह्मा विष्णु शचीवर ॥ करिती एकांती विचार ॥ म्हणती शिव उमा करावी एकत्र ॥ होईल पुत्र षण्मुख ॥१६॥
त्याचे हस्ते मरेल तारकासुर ॥ मग बोलावूनि पंचशर ॥ म्हणती तुवा जावोनि सत्वर ॥ शिवपार्वतीऐक्य करी ॥१७॥
हिमाचळी तप करी व्योमकेश ॥ मन्मथा तू भुलवी तयास ॥ मग रतीसहित कुसुमेश ॥ शिवाजवळी पातला ॥१८॥
पार्वतीच्या स्वरूपात ॥ रती जेव्हा प्रवेशत ॥ वसंते वन समस्त ॥ श्रृंगारिले तेधवा ॥१९॥
शिवाच्या मानसी सतेज ॥ प्रवेशला शफरीध्वज ॥ पाखरे करिती बहु गजबज ॥ शिवध्यान विक्षेपिती ॥१२०॥
ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर ॥ गेला होता तेव्हा दूर ॥ तो पार्वती होवोनि कामातुर ॥ पाठीसी उभी मन्मथाच्या ॥२१॥
शिवे उघडिले नयन ॥ तो पुढे देखिला मीनकेतन ॥ म्हणे माझ्या तपासी केले विघ्न ॥ मग भाललोचन उघडिला ॥२२॥
निघाला प्रळयवैश्वानर ॥ भस्म केला कुसुमशर ॥ फाल्गुनी पौर्णिमा साचार ॥ काम जाळिला ते दिनी ॥२३॥
शिवदूत भूतगण ॥ महाशब्दे हाक देऊन ॥ स्मरगृहशब्द उच्चारून ॥ नानापरी उपहासिती ॥२४॥
शिवाची आज्ञा तैपासून ॥ फाल्गुनमासी हुताशनी करून ॥ जो हे व्रत न पाळी पूर्ण ॥ अवदसा जाण त्या बाधी ॥२५॥
ऐसा संहारून पंचशर ॥ विचार करूनि पंचवक्र ॥ तत्काळ उठोनि कर्पूरगौर ॥ गेला कैलाससदनासी ॥२६॥
रती शोक करी बहुत ॥ मग समाधान करी निर्जरनाथ ॥ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत ॥ रुक्मिणीउदरी अवतरेल ॥२७॥
कमलासने कन्येसी भोगिता ॥ कंदर्पासी शाप दिधला होता ॥ की शिवदृष्टीने तत्त्वता ॥ भस्म होसील कामा तू ॥२८॥
असो इकडे हिमनगकुमारी ॥ शिवप्राप्तीलागी तप करी ॥ सप्तऋषि प्रार्थिती त्रिपुरारी ॥ वरी कन्या हिमनगाची ॥२९॥
पार्वती तप करी जे वनी ॥ शिव तेथे गेला बटुवेष धरूनि ॥ गायनाच्या छंदेकरूनी ॥ पुसे भवानीप्रति तेव्हा ॥१३०॥
कासया तप करिसी येथ ॥ येरी म्हणे जो कैलासनाथ ॥ पति व्हावा एतदर्थ ॥ आचरे तप येथे मी ॥३१॥
बटु बोले ते अवसरी ॥ तू तव हिमनगराजकुमारी ॥ शंकर केवळ भिकारी ॥ महाक्रोधी दारुण ॥३२॥
ओले गजचर्म प्रावरण ॥ शार्दूलचर्म नेसला सर्पभूषण ॥ वसविले महास्मशान ॥ भूतगण सभोवते ॥३३॥
तरी विष्णु विलासी सगुण ॥ त्यासी वरी तू ऐक वचन ॥ तुजयोग्य पंचवदन ॥ वर नव्हे सर्वथा ॥३४॥
ऐकता क्षोभली जगन्माता ॥ म्हणे शिवनिंदका होय परता ॥ वदन न दाखवी मागुता ॥ परम खळा द्वेषिया ॥३५॥
शिवनिंदक जो दुराचार ॥ त्याचा विटाळ न व्हावा साचार ॥ तुज शिक्षा करीन निर्धार ॥ विप्र म्हणोनि राहिले ॥३६॥
देखोनि दुर्गेचा निर्धार ॥ स्वरूप प्रगट करी कर्पूरगौर ॥ पार्वतीने करून जयजयकार ॥ चरण दृढ धरियेले ॥३७॥
शिव म्हणे ते समयी ॥ प्रसन्न झालो माग लवलाही ॥ अंबिका म्हणे ठाव देई ॥ अर्धांगी तुझ्या जगदात्म्या ॥३८॥
अवश्य म्हणोनि त्रिपुरारी ॥ कैलासासी गेला ते अवसरी ॥ पितृसदना झडकरी ॥ गेली तेव्हा जगदंबा ॥३९॥
मग सप्तऋषि ते वेळे ॥ शिवे हिमाचळा पाठविले ॥ हिमनगे ते आदरे पूजिले ॥ षोडशोपचारेकरूनिया ॥१४०॥
अरुंधतीने येऊन ॥ भवानी पाहिली अवलोकून ॥ म्हणे शिव आणि भवानी पूर्ण ॥ जोडा होय निर्धारे ॥४१॥
मन्मथसंवत्सर चैत्रमासी ॥ लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी ॥ निश्चय करूनि सप्तऋषि ॥ स्वस्थानासी पातले ॥४२॥
कधी होईल शिवगौरीलग्न ॥ इच्छिती ब्रह्मेंद्रादि सुरगण ॥ तारकासुराचा तो प्राण ॥ शिवपुत्र घेईल कधी ॥४३॥
इकडे नंदीसी पाठवूनि ते वेळे ॥ सर्व देव शिवे बोलाविले ॥ घेवोनि त्रिदशांचे पाळे ॥ पाकशासन पातला ॥४४॥
इंदिरेसहित इंदिरावर ॥ सावित्रीसहित चतुर्वक्र ॥ अठ्यायशी सहस्त्र ऋषीश्वर ॥ शिष्यांसहित निघाले ॥४५॥
सिद्ध चारण गुह्यक ॥ पितृगण मरुद्गण वसुअष्टक ॥ एकादशरुद्र द्वादशार्क ॥ यक्षनायक पातला ॥४६॥
आपुल्याला वाहनी बैसोन ॥ नवग्रह अष्टनायिका आदिकरून ॥ किन्नर गंधर्व सर्वही ॥४७॥
एवं सर्वांसहित शंकर ॥ हिमाचलासी आला सत्वर ॥ नगेंद्र येवोनि समोर ॥ पूजोनि नेत सकळाते ॥४८॥
दशसहस्त्र योजने मंडप ॥ उभविला ज्याचे तेज अमूप ॥ सुवर्णसदने देदीप्य ॥ जानवशासी दीधली ॥४९॥
शिवस्वरूप पाहता समस्त ॥ वर्हाडी होती विस्मित ॥ एक म्हणती वृद्ध बहुत ॥ पुराणपुरुष अनादि ॥१५०॥
हा आहे केवळ निर्गुण ॥ नवरी स्वरुपे अति सगुण ॥ असो देवकप्रतिष्ठा करून ॥ मूळ आला हिमाद्रि ॥५१॥
आद्यंत अवघे साहित्य ॥ कमलोद्भव स्वये करीत ॥ नवनिधी अष्ट महासिद्धी राबत ॥ न्यून तेथे नसे काही ॥५२॥
असो नवरा मिरवीत ॥ नेला आपुल्या मंडपात ॥ मधुपर्कादि पूजाविधि समस्त ॥ हिमाचळ करीतसे ॥५३॥
लग्नघटिका आली जवळी ॥ तव ते श्रृंगारसरोवरमराळी ॥ बाहेर आणिली हिमनगबाळी ॥ उभी केली पटाआड ॥५४॥
लग्नघटिका पाहे दिनपती ॥ मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ॥ ॐपुण्याह निश्चिती ॥ कमलासन म्हणतसे ॥५५॥
असो यथाविधि संपूर्ण ॥ दोघा झाले पाणिग्रहण ॥ होमासी करिति प्रदक्षिण ॥ शिवशक्ती तेधवा ॥५६॥
इतुके याज्ञिक झाले सर्वही ॥ परी नोवरी कोणी देखिली नाही ॥ प्रदक्षिणा करिता ते समयी ॥ पदनख देखिले विधीने ॥५७॥
कामे व्यापिला सूर्यजामात ॥ पटपटा वीर्यबिंधु पडत ॥ साठीसहस्त्र वालखिल्य तेथ ॥ जन्मले क्षण न लागता ॥५८॥
अन्याय देखोनि थोर ॥ मदनांतक कोपला अनिवार ॥ ब्रह्मयाचे पाचवे शिर ॥ छेदून टाकिले तेधवा ॥५९॥
झाला एकचि हाहाकार ॥ त्यावरी वैकुंठीचा सुकुमार ॥ समाधान करी अपार ॥ चतुर्वक्र नाम तैपासुनी ॥१६०॥
असो यथाविधि सोहळे ॥ चारी दिवस संपूर्ण जाहले ॥ सकळ देव गौरविले ॥ वस्त्रालंकारी हिमनगे ॥६१॥
सवे पार्वती घेऊनी ॥ कैलासा आला शूलपाणी ॥ यावरी सर्व देव मिळोनी ॥ प्रार्थिते झाले विश्वनाथा ॥६२॥
खुंटली विश्वाची उत्पत्ती ॥ मन्मथ उठवी उमापती ॥ मग तो मीनध्वज पुढती ॥ अनंग करोनि जीवविला ॥६३॥
अंधकपुत्र तारकासुर ॥ तेणे पळविले देव समग्र ॥ शिवासी होईल कधी पुत्र ॥ देव समग्र वांछिती ॥६४॥
चारी युगेपर्यंत ॥ शिव उमा एकांती रमत ॥ परी नोहे वीर्यपात ॥ नव्हे सुत याकरिता ॥६५॥
तो तारकासुरे केला आकांत ॥ स्वर्ग जाळिले समस्त ॥ देवललना धरूनि नेत ॥ दासी बहुत पै केल्या ॥६६॥
देव शिवासी शरण जाती ॥ तव ती दोघे एकांती रमती ॥ देव ऋषि बाहेर तिष्ठती ॥ प्रवेश कोणा नव्हेचि ॥६७॥
मग अग्नि आत पाठविला ॥ अतीतवेष तेणे धरिला ॥ तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला ॥ देवी पाठविला मित्र म्हणोनी ॥६८॥
हाक फोडोनि भिक्षा मागत ॥ शिव पार्वतीस आज्ञापित ॥ माझे वीर्य धरोनि अद्भुत ॥ भिक्षा देई अतीताते ॥६९॥
मग अमोघ वीर्य धरून ॥ अग्नीसी देत अंबिका आणोन ॥ सांडले जेथे वीर्य जाण ॥ रेतकूप झाला तो ॥१७०॥
तोचि पारा परम चंचळ ॥ न धरवे वीर्य कोणा हाती तेजाळ ॥ असो कृशानने वीर्य तत्काळ ॥ प्राशन केले तेधवा ॥७१॥
अग्नि झाला गरोदर ॥ परम लज्जित हिंडत कांतार ॥ तो साही कृत्तिका परम सुंदर ॥ ऋषिपत्न्या देखिल्या ॥७२॥
त्या गंगेत स्नान करूनी ॥ तापत बैसल्या साहीजणी ॥ तव अग्नीने गर्भ काढूनि ॥ पोटात घातला साहींच्या ॥७३॥
साहीजणी झाल्या गर्भिणी ॥ परम आश्चर्य करिती मनी ॥ मग लज्जेने गर्भ काढूनि ॥ साहीजणींनी त्यागिला ॥७४॥
साहींचे रक्त एक झाले ॥ दिव्य शरीर तत्काळ घडले ॥ सहा मुखे हस्त शोभले ॥ द्वादश सरळ तेजस्वी ॥७५॥
कार्तिक मासी कृत्तिकायोगी ॥ कुमार जन्मला महायोगी ॥ मयूर वाहन भस्म अंगी ॥ उपासित शिवाते ॥७६॥
शिवे निजपुत्र जाणोनी ॥ नेवोनि लाविला अपर्णास्तनी ॥ सप्त वर्षे मृडानी ॥ लालन पालन करी त्याचे ॥७७॥
देवांसी सांगे वैश्वानर ॥ शिवासी झाला स्कंद पुत्र ॥ ऐकता देव समग्र ॥ तारकावरी चालिले ॥७८॥
सेना जयाची बहात्तर अक्षोहिणी ॥ त्याचे नगर वेढिती सुधापानी ॥ पृतनेसहित तेच क्षणी ॥ तारकासुर बाहेर निघे ॥७९॥
इंद्रे स्वामीकार्तिकापासी जाऊन ॥ सेना पतित्व दिधले संपूर्ण ॥ दिव्यरथी बैसवून ॥ अभिषेकिला कुमार ॥१८०॥
इकडे तारका सुर सुधापानी ॥ युद्ध करिती झोटधरणी ॥ देव त्रासविले दैत्यांनी ॥ आले पळोनि कुमाराकडे ॥८१॥
स्कंदापुढे कर जोडून ॥ देव करिती अपार स्तवन ॥ रक्षी तारकासुरापासून ॥ शिवनंदन तोषला ॥८२॥
देवांचा वृत्तांत जाणोनि सकळ ॥ कुमारे धरिले रूप विशाळ ॥ तो तारकासुर धाविन्नला प्रबळ ॥ शिवकुमार लक्षुनी ॥८३॥
तेहतीस कोटी सुरवत ॥ उभे स्वामीचे पाठी भार ॥ तारकाअंगी बळ अपार ॥ दशसहस्त्र कुंजरांचे ॥८४॥
तारकासुर अनिवार ॥ वर्षे सायकांचे संभार ॥ स्वामीचे पाठीसी सुर ॥ लपती सत्वर जाऊनी ॥८५॥
लक्षूनिया पाकशासन ॥ तारके शक्ति दिधली सोडून ॥ प्रळयचपळेसी मागे टाकून ॥ मनोवेगे चालली ॥८६॥
भयभीत शक्र होऊन ॥ करी हरिस्मरण कर जोडून ॥ म्हणे हे इंदिरामानसरंजन ॥ निवारी येवोनि शक्ति हे ॥८७॥
ब्रह्मानंदा विश्वव्यापका ॥ दशावतारचरित्रचाळका ॥ मधुमुरनरकांतका ॥ निवारी प्रळयशक्ती हे ॥८८॥
वैकुंठीहूनि योगमाया ॥ हरीने धाडिली लवलाह्या ॥ तिणे ते शक्ती परतोनिया ॥ एकीकडे पाडिली ॥८९॥
यावरी तारके बाणांचे पूर ॥ स्वामीवरी सोडिले अपार ॥ मुख पसरोनि शिवकुमार ॥ तितुके गिळिता जाहला ॥१९०॥
नाना शस्त्रे अस्त्रशक्ती ॥ तारके सोडिल्या अनिवारगती ॥ तितुक्या गिळिल्या सहजस्थिती ॥ शास्त्रसंख्यावदनाने ॥९१॥
कल्पांतरुद्रासमान ॥ भयानक दिसे मयूरवाहन ॥ तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून ॥ तेही गिळी अवलीळे ॥९२॥
जितुके शस्त्रमंत्र निर्वाण ॥ तितुके प्रेरीतसे चहूकडून ॥ प्रळयकाळासम शिवनंदन ॥ गिळी क्षण न लागता ॥९३॥
मग निःशस्त्र तारकासुर ॥ स्यंदनाहूनि उतरला सत्वर ॥ स्वामीवरी धावे अनिवार ॥ सौदामिनीसारिखा ॥९४॥
ऐसे देखोनि षडानन ॥ कृतांता ऐसी हाक देऊन ॥ रथाखाली उतरून ॥ मल्लयुद्ध आरंभिले ॥९५॥
सप्तदिवसपर्यंत ॥ युद्ध झाले परम अद्भुत ॥ तारकासुर अत्यंत ॥ जर्जर केला आपटोनी ॥९६॥
पायी धरोनि अवलीला ॥ चक्राकार भोवंडिला ॥ मग धरणीवरी आपटिला ॥ चूर्ण झाला मृद्धटवत ॥९७॥
निघोनिया गेला प्राण ॥ दुंदुभी वाजवी शचीरमण ॥ पुष्पे वर्षती सुरगण ॥ कर जोडोनी स्तुति करिती ॥९८॥
मारिला जेव्हा तारकासुर ॥ तेव्हा सात वर्षाचा शिवकुमार ॥ मग सेनापतित्व समग्र ॥ इंद्रे त्यासी दीधले ॥९९॥
तारकासुराचे नगर ॥ इंद्रे लुटिले समग्र ॥ देवस्त्रिया सोडविल्या सत्वर ॥ सर्व देव मुक्त झाले ॥२००॥
लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष ॥ कुमार गेला वाराणसीस ॥ नमूनि शिवमृडानिस ॥ सुख अपार दीधले ॥१॥
मग झाले मौजीबंधन ॥ सर्व तीर्थे करी षडानन ॥ मग कपाटी बैसला जाऊन ॥ अनुष्ठान करी सुखे ॥२॥
षडाननास भवानी म्हणत ॥ ब्रह्मचर्य केले आजपर्यंत ॥ आता स्त्री करूनि यथार्थ ॥ गृहस्थाश्रम करी की ॥३॥
षडानन म्हणे अंबेप्रती ॥ सांग स्त्रिया कैशा असती ॥ म्या देखिल्या नाहीत निश्चिती ॥ कैसी आकृति सांगे मज ॥४॥
अपर्णा म्हणे सुकुमारा ॥ मजसारिख्या स्त्रिया सर्वत्रा ॥ ऐकता हासे आले कुमारा ॥ काय उत्तरा बोलत ॥५॥
तुजसारिख्या स्त्रिया जरी ॥ तुजसमान मज निर्धारी ॥ तुझ्या वचनासी मातुश्री ॥ अंतर पडो नेदी मी ॥६॥
ऐसे कुमार बोलोन ॥ महाकपाटात जाय पळोन ॥ मग ते जगन्माता आपण ॥ धरू धाविन्नली तयाते ॥७॥
नाटोपे कुमार ते क्षणी ॥ अंबा दुःखे पडे धरणी ॥ जे त्रिभुवनपतीची राणी ॥ वेदपुराणी वंद्य जे ॥८॥
अरे तू कुमारा दावी वदना ॥ आला माझ्या स्तनासी पान्हा ॥ कोणासी पाजू षडानना ॥ निजवदना दाखवी ॥९॥
घेई तुझे दूधलोणी ॥ म्हणोनि कुमार वर्मी ते क्षणी ॥ बोले तेव्हा शापवाणी ॥ क्रोधेकरूनि कुमार तो ॥२१०॥
माझे दर्शना जी स्त्री येईल ॥ ती सप्तजन्म विधवा होईल ॥ स्वामीदर्शना पुरुष येईल ॥ कार्तिक मासी कृत्तिकायोगी ॥११॥
तो जन्म सभाग्य ॥ होईल धनाढ्य वेदपारंग ॥ अनामिक हो अथवा मातंग ॥ दर्शने लाभ समानचि ॥१२॥
ऋषि विनविती समस्त ॥ भवानी तुजलागी तळमळत ॥ भेटोनि येई त्वरित ॥ वाराणसीस जाऊनी ॥१३॥
मग स्वामी आनंदवना जाऊनी ॥ आनंदविली शिवभवानी ॥ उभयतांचे समाधान करूनी ॥ मागुती गेला पूर्व स्थळा ॥१४॥
स्कंदपुराणी कथा सूत ॥ शौनकादिकांप्रति सांगत ॥ ऐकता विघ्ने समस्त ॥ क्षणमात्रे दग्ध होती ॥१५॥
अपर्णाह्र्दयाब्जमिलिंदा ॥ श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ॥ पूर्णब्रह्मा अनादिसिद्धा ॥ आनंदकंदा जगद्गुरु ॥१६॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ त्रयोदशोध्याय गोड हा ॥२१७॥
॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
Search
Search here.