श्रीशिवलीलामृत अध्याय चौदावा

ग्रंथ - पोथी  > शिवलीलामृत Posted at 2018-12-04 05:49:06
श्रीशिवलीलामृत अध्याय चौदावा
श्रीगणेशाय नमः ॥
भस्मासुरहरणा भाललोचना ॥ भार्गववरदा भस्मलेपना ॥ भक्तवत्सला भवभयहरणा ॥ भेदातीता भूताधिपते ॥१॥ भवानीवरा भक्ततारका ॥ भोगिभूषणा भूतपालका ॥ भाविकरक्षका भवभयहारका ॥ भक्तरक्षका भवशोषणा ॥२॥ त्रितापशमना त्रिदोषहारका ॥ त्रिगुणातीता त्रिपुरांतका ॥ त्रिभुवनजनका त्र्यंबका ॥ त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या ॥३॥ तुझ्या कृपाबळे समस्त ॥ त्रयोदश अध्यायपर्यंत ॥ कथिले शिवलीलामृत ॥ आता कळसाध्याय चौदावा ॥४॥ तेराव्या अध्यायी शिवगौरीलग्न ॥ सांगितले स्वामीकार्तिकाचे जनन ॥ यावरी शौनकादिकालागून ॥ सूत सांगे नैमिषारण्यी ॥५॥ सिंहावलोकने तत्त्वता ॥ परिसा गजास्यषडास्यांची कथा ॥ दोघेही धाकुटे असता ॥ जगदंबा खेळवी प्रीतीने ॥६॥ गजतुंडा ओसंगा घेऊन ॥ विश्वजननी देत स्तनपान ॥ शुंडादंडेकरून ॥ दुग्ध ओढीत गजास्य ॥७॥ अंबेच्या पृष्ठीवरी प्रीती ॥ शुंडा फिरवीत गणपती ॥ शुंडेत पय साठवूनि षण्मुखाप्रती ॥ बोलतसे तेधवा ॥८॥ म्हणे हे घेई का अमृत ॥ ब्रह्मादिका जे अप्राप्त ॥ स्कंद बोले क्रोधयुक्त ॥ उच्छिष्ट तुझे न घे मी ॥९॥ षडानन म्हणे चराचरजननी ॥ लंबनासिक मजलागूनी ॥ उच्छिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी ॥ सांग मृडानी काही याते ॥१०॥ शुंडेसी धरूनिया खाले ॥ पाडू काय ये वेळे ॥ माते याचे नासिक विशाळ आगळे ॥ का हो ऐसे केले तुवा ॥११॥ इंद्र चंद्र मित्र निर्जर ॥ मूर्ति प्रसवलीस मनोहर ॥ परी हा लंबनासिक कर्ण थोर ॥ दंत एक बाहेर दिसतसे ॥१२॥ ऐसा का प्रसवलीस बाळ ॥ ऐकता हासे पयःफेनधवल ॥ धराधरेंद्रनंदिनी वेल्हाळ ॥ तिसीही हास्य नाटोपे ॥१३॥ स्कंद म्हणे जननी पाही ॥ यासी उतरी मज स्तनपान देई ॥ मग जगदंबेने लवलाही ॥ विघ्नेशा खाली बैसविले ॥१४॥ षण्मुख आडवा घेवोनी ॥ स्तन जी घाली त्याच्या वदनी ॥ पाचही मुखे आक्रंदोनी ॥ रडो लागली तेधवा ॥१५॥ ते देखोनि गणनाथ ॥ पोट धरोनि गदगदा हासत ॥ म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत ॥ हाक फोडीत आक्रोशे ॥१६॥ एक स्तन घातला याचे वदनी ॥ आणीक पाच आणसी कोठूनी ॥ ऐसे ऐकत पिनाकपाणी ॥ काय हासोनि बोलत ॥१७॥ काय म्हणतो गजवदन ॥ ऐसा का प्रसवलीस नंदन ॥ यावरी अपर्णा सुहास्यवदन ॥ प्रतिउत्तर देतसे ॥१८॥ म्हणे हा तुम्हांसारिखा झाला नंदन ॥ तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ॥ ऐकता हासला त्रिनयन ॥ पुत्र पाहोन सुखावे ॥१९॥ यावरी षण्मुख आणि गणपती ॥ लीलकौतुके दोघे क्रीडती ॥ विनोदे कलह करिती ॥ अंतरी प्रीती अखंड ॥२०॥ दोघेही रडता ऐकोनी ॥ धावोनी आली जगत्त्रयजननी ॥ वक्रतुंडासी ह्रदयी धरोनी ॥ म्हणे बाळका काय झाले ॥२१॥ तव तो म्हणे स्कंदे येवोन ॥ अंबे धरिले माझे कर्ण ॥ बोलिला एक कठीण वचन ॥ तुझे नयन सान का रे ॥२२॥ जगदंबा मग हासोन ॥ अग्निसंभूताप्रति बोले वचन ॥ गजवदनासी कठीण भाषण ॥ ऐसे कैसे बोललासी ॥२३॥ स्कंद म्हणे तर्जनी उचलोन ॥ येणे मोजिले माझे द्वादश नयन ॥ यावरी हैमवती हासोन ॥ एकदंताप्रति बोलत ॥२४॥ म्हणे हे तुवां अनुचित केले ॥ कुमाराचे नयन का मोजिले ॥ यावरी नागानन बोले ॥ ऐक माते अन्याय याचा ॥२५॥ माझी शुंडा लंबायमान ॥ येणे मोजिली चवंगे घालून ॥ अन्याय हा थोर त्रिभुवनाहून ॥ करी ताडण अंबे यासी ॥२६॥ यावरी स्वामी कार्तिक बोलत ॥ अंबे येणे माझे मोजिले हस्त ॥ यावरी करिमुख बोलत ॥ मैनाकभगिनी ऐक पा ॥२७॥ याचा अन्याय एक सांगेन ॥ ऐकता तू यासी करिसील ताडण ॥ नागात्मजा आणि त्रिलोचन ॥ सावधान होऊन ऐकती ॥२८॥ इभमुख म्हणे भेडसावून ॥ मज बोलिला हा न साहवे वचन ॥ तुझे पोट का थोर पूर्ण ॥ मोदक बहू भक्षिले ॥२९॥ ऐसे ऐकता मृडानी ॥ दोघांसी ह्रदयी धरी प्रीतीकरूनी ॥ दोघांसी प्रियवस्तु देऊनी ॥ समजाविले तेधवा ॥३०॥ यावरी मदनांतक पाहे ॥ सिंहासनी बैसला आनंदमये ॥ जगदंबा मुखाकडे पाहे ॥ हास्यवदन करूनिया ॥३१॥ यावरी विरूपाक्ष बोलत ॥ का हो हास्य आले अकस्मात ॥ यावरी त्रैलोक्यमाता म्हणत ॥ नवल एक दिसतसे ॥३२॥ तुमच्या जटामुकुटात ॥ ललनाकृति काय दिसत ॥ तुमची करणी अद्भुत ॥ पद्मजबिडौजा समजेना ॥३३॥ कैलासपति म्हणे इभगमने ॥ हरिमध्ये मृगशावकनयने ॥ मस्तकी जळ धरिले वरानने ॥ बिंबाधरे पिकस्वरे ॥३४॥ यावरी चातुर्यसरोवरमराळी ॥ हेरंबजननी म्हणे कपाळमाळी ॥ जळांतरी स्त्रीचे वदन ये वेळी ॥ दिसते मज भालनेत्रा ॥३५॥ यावरी बोले कैलासराज ॥ विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारिज ॥ शोभायमान सतेज ॥ टवटवित दिसतसे ॥३६॥ यावरी सजलजलदवर्णा ॥ स्कंदमाता म्हणे पंचदशनयना ॥ कुरळकेश व्याघ्रचर्मवसना ॥ कृष्णवर्ण दिसताती ॥३७॥ यावरी बोले पंचवदन ॥ कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन ॥ नसतेचि पुससी छंद घेवोन ॥ रमारमणसहोदरी ॥३८॥ यावरी बोले भुजंगत्रिवेणी ॥ कमळासी भोवया का खट्वांगपाणी ॥ तुमच्या मायेची विचित्र करणी ॥ आम्नाय श्रुती नेणती ॥३९॥ यावरी बोले हिमनगजामात ॥ भ्रुकट्या नव्हे पाहे त्वरित ॥ सलिललहरी तळपत ॥ दृष्टि तरळली तुझि का हो ॥४०॥ यावरी सकळ प्रमादांची स्वामिनी ॥ बोले कंबुकंठी कमंडलुस्तनी ॥ म्हणे कैरवासम नेत्र पिनाकपाणी ॥ का हो दिसती आकर्ण ते ॥४१॥ यावरी शफरीध्वजदहन बोलत ॥ कमळाभोवते नीर बहुत ॥ नेत्र नव्हेत मीन तळपत ॥ हंसगमने निरखी बरे ॥४२॥ जे अनंतगुणपरिपूर्ण वेल्हाळ ॥ त्रिपुरहरसुंदरी बोले प्रेमळ ॥ म्हणे राजीवा स्तनयुगुळ ॥ कमंडलुऐसे दिसती का ॥४३॥ यावरी बोले त्रिशूळपाणी ॥ ऐके वसुधाधरनंदिनी ॥ ते स्तन नव्हेती दोन्ही ॥ विलोकोनि पाहे बरे ॥४४॥ गंगार्हदाचे दोन्ही तीरी ॥ चक्रवाके बैसली साजिरी ॥ दुर्गा म्हणे मदनारी ॥ बहुत साहित्य पुरवीतसा ॥४५॥ एकाचे अनेक करून ॥ दाविले हे त्रिभुवन ॥ तुमचे मौनेचि धरावे चरण ॥ बोलता अप्रमाण न म्हणावे ॥४६॥ मग मांडूनिया सारिपाट ॥ खेळती दाक्षायणी नीळकंठ ॥ ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ ॥ भक्त होती त्रिजगती ॥४७॥ दोघे खेळता आनंदघन ॥ तो आला कमलोद्भवनंदन ॥ ब्रह्मवीणा वाजवून ॥ करी स्तवन अपार ॥४८॥ मग क्षण एक स्वस्थ होऊनी ॥ खेळ विलोकी नारदमुनी ॥ म्हणे पण केल्यावाचूनी ॥ रंग न ये खेळाते ॥४९॥ दोघांसी मानले ते बहुत ॥ मग पण करूनिया खेळत ॥ जिंकील त्यासी एक वस्त ॥ आपुली द्यावी निर्धार हा ॥५०॥ जो प्रथम डाव तेचि क्षणी ॥ जिंकीती झाली मेनकानंदिनी ॥ व्याघ्रांबर घेतले हिरोनी ॥ नारदमुनी हासतसे ॥५१॥ दुजाही डाव जिंकिता भवानी ॥ घेतले गजचर्म हिरोनी ॥ एकामागे एक तेचि क्षणी ॥ दहाही आयुधे घेतली ॥५२॥ जो तो डाव जिंकी भवानी ॥ सर्व भूषणे घेतली हिरोनी ॥ शेवटी कौपीनही सांडोनी ॥ शंकर झाला दिगंबर ॥५३॥ सुरभिपुत्र जिंकिला ॥ तोही देवीने आपुला केला ॥ नारद गदगदा हासिन्नला ॥ काय बोलिला शिवासी ॥५४॥ म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून ॥ गेला तुझा महिमा पूर्ण ॥ सृष्टि अवघी मायाधीन ॥ तू निर्गुण निराकार ॥५५॥ चराचर आहे मायाधीन ॥ तुज इणे दिधले सगुणपण ॥ येरवी तू अव्यक्त पूर्ण ॥ तुज कोण पुसत होते ॥५६॥ एवं तू मायाधीन झालासी पूर्ण ॥ आता भक्तांसी कैसे दाविसी वदन ॥ ऐसे ऐकता भाललोचन ॥ गेला रुसून घोर वना ॥५७॥ इतुके कृत्य करून ॥ गेला तेथूनि ब्रह्मनंदन ॥ शंकरे सर्वसंग टाकून ॥ निरंजनी वास केला ॥५८॥ शोधिता न पडे कोणासी ठायी ॥ योगी ध्याती सर्वदा ह्रदयी ॥ न कळे मूळाग्र कोठे काही ॥ जाति कुळ नसेचि ॥५९॥ नामरूपगुणातीत ॥ गोत्रवर्ण आश्रमविरहित ॥ चहू देहांसीअतीत ॥ कोणा अंत न कळेचि ॥६०॥ असो जगदंबा सख्या घेऊनिया ॥ वनासी चालिली शोधावया ॥ गिरिकंदरी मठ गुहा शोधूनिया ॥ भागली बहुत जगदंबा ॥६१॥ सर्वही तीर्थे शोधिली सवेग ॥ बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग ॥ जो शोधिता अष्टांगयोग ॥ योगिया ठायी पडे ना ॥६२॥ पंचाग्निसाधन धूम्रपान ॥ जटाधारी नग्न मौन ॥ एकी सदा झाकिले नयन ॥ एक गगन विलोकिती ॥६३॥ एक उभेचि निरंतर ॥ एक घेती वायूचा आहार ॥ त्यांसही पुसता श्रीशंकर ॥ कोठे आहे न बोलती ॥६४॥ एक करिती सदा यज्ञ ॥ करिती हिंसा बलिदान ॥ परी तेही धुरे डोळे भरून ॥ कष्टी होती सर्वदा ॥६५॥ एक चौसष्ट कळा दाविती ॥ एक चौदा विद्या मिरविती ॥ एक वादविवाद निगुती ॥ करिता बहुत भागले ॥६६॥ एक सांगती पुराण ॥ एक नाचती उड्या घेऊन ॥ लोकांसी सांगती उपदेशज्ञान ॥ परी उमारमण दुरावला ॥६७॥ एक नाशिती कुश मृत्तिका उदक ॥ म्हणती आम्ही इतुकेनि पावन देख ॥ त्यांसही पुसता कैलासनायक ॥ न पडे ठायी तत्त्वता ॥६८॥ जे आदिमाया विश्वजननी ॥ अनंतशक्तींची स्वामिनी ॥ ते श्रमली नाना साधनी ॥ इतरांची कहाणी काय तेथे ॥६९॥ ठायी पडावया शिवस्वरूप ॥ क्षीराब्धिजापति करी तप ॥ मघवा द्रुहिण करिती साक्षेप ॥ निशिदिनी याचिलागी ॥७०॥ ऋग्वेद स्थापित कर्म ॥ यजुर्वेद बोले ज्ञान निःसीम ॥ उपासनामार्ग उत्तम ॥ अथर्वण स्थापितसे ॥७१॥ सामवेद सांगे गायन ॥ न्यायशास्त्री भेद गहन ॥ म्हणती ईश्वर समर्थ जीव सान ॥ त्याचे पद न पावती ते ॥७२॥ मीमांसक स्थापिती कर्ममार्ग ॥ सांख्य प्रक्रुतिपुरुषविभाग ॥ पातंजली सांगती योग ॥ शब्दविभाग व्याकरणी ॥७३॥ सर्व निरसूनि उरले उत्तम ॥ वेदांती म्हणती तेचि ब्रह्म ॥ तो शिव ब्रह्मानंद परम ॥ वेदशास्त्रा अगम्य जो ॥७४॥ त्या शिवाचे नाम घेवोनी ॥ जगदंबा बाहे घोर वनी ॥ सकळ अभिमान टाकूनी ॥ वल्लभा मी शरण तूते ॥७५॥ सकळ तत्त्वे शोधिता साचार ॥ शेवटी होय साक्षात्कार ॥ तैसा हिमाचळी त्रिपुरहर ॥ विलोकिला जगदंबेने ॥७६॥ तो स्वात्ममुखी झाला तल्लीन ॥ झाकिले असती पंचदश नयन ॥ देवी म्हणे श्वशुरगृही येऊन ॥ रहिवास केला असे ॥७७॥ अपर्णा मनी विचारी ॥ याचि रूपे जवळी जाऊ जरी ॥ तरी मजवरी ये अवसरी ॥ क्रोधायमान होईल ॥७८॥ मग भिल्लीचा वेष धरून ॥ मयूरपिच्छांचे केले वसन ॥ अनुपम वेष धरून ॥ मुरहरभगिनी चालिली ॥७९॥ अनंतकमळभवांडमाळा ॥ त्रिभुवनसुंदरी गुंफी हेळा ॥ तिने स्मरहर मोहिला ॥ नृत्यगायनकरूनिया ॥८०॥ अनंत शक्ती भोवत्या विराजिती ॥ विमानी अष्टनायिका तन्मय होती ॥ किन्नर गंधर्व आश्चर्य करिती ॥ गायनरीती ऐकूनिया ॥८१॥ वैरभाव वनचरे विसरती ॥ आहार त्यजिला तन्मय होती ॥ नद्यांचे जलप्रवाह खुंटती ॥ पक्षी विसरती देहभाव ॥८२॥ निश्चळ झाला पवन ॥ विधुकुरंग गेला वेधोन ॥ कुंभिनीभार सांडोन ॥ फणिपति वरी येऊ पाहे ॥८३॥ आंगीचा सुटला दिव्य आमोद ॥ देव पाहती होवोनि षट्पद ॥ नृत्य करिता भाव विविध ॥ दावी नाना प्रकारींचे ॥८४॥ शीतलत्व दाहकत्व सांडून ॥ वाटे ताटंक झाले विधुचंडकिरण ॥ देवललना म्हणती ओवाळून ॥ इजवरून जावे समस्ती ॥८५॥ आदिजननीचे अपार लाघव ॥ नेणती शक्रादि कमलोद्भव ॥ दिव्य हिरेखाणींचे वैभव ॥ दंततेजे झाकिले ॥८६॥ दंतपंक्तींचा झळकता रंग ॥ खडे ते हिरे होती सुरंग ॥ तनूचा सुगंध अभंग ॥ नभ भेदूनि वरी जाय ॥८७॥ पदमुद्रा जेथे उमटत ॥ सुवासकमळे तेथे उगवत ॥ जेथींच्या परागासी वेधोनि वसंत ॥ प्रदक्षिणा करी प्रीतीने ॥८८॥ अनंतविद्युल्लताकल्लोळ ॥ तैसे स्वरूपतेज निर्मळ ॥ नेत्र उघडोनि जाश्वनीळ ॥ पाहता झाला तेधवा ॥८९॥ पायी पैंजण नूपुरे रुणझुणती ॥ त्यांत क्षुद्रघंटा रसाळ गर्जती ॥ करींची कंकणे झणत्कारती ॥ नृत्यगतीसरसीच ॥९०॥ भूलताचाप चढवूनी ॥ कामशत्रु विंधिला नयनकटाक्षबाणी ॥ मनकुरंग पाडिला धरणी ॥ सुरवरा करणी न कळेचि ॥९१॥ दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण ॥ पंचबाणे व्यापिला पंचवदन ॥ तप ध्यान विसरून वृत्तांत पुसे तियेते ॥९२॥ म्हणे तू नारी कोठील कोण ॥ कामानळ शांतवी वर्षोनि घन ॥ तुझे स्वरूपलावण्य ॥ त्रिभुवनी ऐसे दुजे नाही ॥९३॥ तुझा वदन इंदुविलोकून ॥ चकोर झाले माझे नयन ॥ आता वरी मजलागून ॥ तुजअधीन मी झालो ॥९४॥ यावरी बोले भिल्लिणी ॥ उमेऐसी ललना टाकूनी ॥ का बैसलासी घोर वनी ॥ कैलासभुवन त्यजोनिया ॥९५॥ मी तो परनारी निश्चित ॥ न वरी न घडे कदा सुरत ॥ तुवा मन जिंकिले नाही यथार्थ ॥ तरी तपस्वी कैसा तू ॥९६॥ यावरी बोले पिनाकपाणी ॥ मी दुर्गेवरी आलो रुसोनी ॥ तिचे मुख न पाहे परतोनी ॥ नाम स्वप्नी न घेचि ॥९७॥ यावरी भिल्लिणी बोलत ॥ पति माझा रागिष्ट अत्यंत ॥ हे त्रिभुवन जाळील क्षणात ॥ अणुमात्र गोष्ट कळताचि ॥९८॥ यावरीबोले जगन्नाथ ॥ ती बहुकाळाची कठिण अत्यंत ॥ दक्षयागी उडी घालीत ॥ क्रोध अद्भुत तियेचा ॥९९॥ पुढे गेली पर्वताचे पोटी ॥ मागुती तिसी वरी मी धूर्जटी ॥ परी ती कौटाळीण मोठी ॥ अतिकपटी मी जाणे ॥१००॥ भिल्लिणी म्हणे ऐकिले कानी ॥ तू कपटी आहेस तिजहूनी ॥ शिरी ठेविली स्वर्धुनी ॥ भोळी भवानी अत्यंत ॥१॥ दुर्गेऐसी पट्टराणी ॥ टाकूनि का हिंडसी वनी ॥ परललना देखोनि नयनी ॥ गळा येवोनि पडो पाहसी ॥२॥ मागुती बोले कैलासनाथ ॥ क्षणात सृष्टी घडामोड करीत ॥ शुंभनिशुंभादि दैत्य ॥ युद्ध करूनि मर्दिले तिणे ॥३॥ ती जरी येथे आली धावोन ॥ उदंड प्रार्थना केली पूर्ण ॥ तरी मी नव जाय परतोन ॥ कैलासासी निश्चये ॥४॥ तिसी न करी संभाषण ॥ तूचि वरी मी झालो तुजआधीन ॥ जिकडे नेशील तिकडे येईन ॥ वचनाधीन तुझ्या मी ॥५॥ यावरी बोले गोरटी ॥ भवानी बैसली तुझ्या पाठी ॥ दोन वेळा वरिला धूर्जटी ॥ तिची गति हे केली ॥६॥ मग माझा पाड काय तुज ॥ केव्हा टाकोनि जाशील न कळे मज ॥ द्यूती पण खेळता सहज ॥ तुझे त्वांचि हारविले ॥७॥ न बोलेचि मदनदहन ॥ भिल्लिणी मागुती करी नृत्य गायन ॥ मग उठिला पंचदशनयन ॥ तिसी आलिंगन द्यावया ॥८॥ अंबा चालिली सत्वर ॥ दीर्घशब्दे बोले त्रिपुरहर ॥ मुखशशी दावी सुंदर ॥ भाक घेई पै माझी ॥९॥ तू मज माळ घाली येऊन ॥ मी न जाय तुज टाकोन ॥ मग जगदंबा बोले हासोन ॥ यावे भुवना माझिया ॥११०॥ मग मी तुमची होईन कामिनी ॥ अवश्य बोले खट्वांगपाणी ॥ मदनांतक वेधोनी ॥ कैलासासी नेला तेधवा ॥११॥ सिंहासनी बैसवून ॥ षोडशोपचारे केले पूजन ॥ देवीने दृढ धरिले चरण ॥ कंठी माळ घातली ॥१२॥ देवी आपुले स्वरूप प्रगट करी ॥ तटस्थ पाहे त्रिपुरारी ॥ मग हासती परस्परी ॥ एकमेका पाहोनी ॥१३॥ शिव म्हणे धन्य भवानी ॥ त्वांचि आणिले मज समजावोनी ॥ सूत शौनकादिकांलागोनी ॥ कथा सांगे विचित्र ॥१४॥ करी वीणा घेऊनि ब्रह्मसुत ॥ शिवाजवळी आला अकस्मात ॥ म्हणे हे विश्वंभरा विश्वनाथ ॥ तुझे भक्त देखिले बहू ॥१५॥ परी कांतिनगरी श्रियाळ ॥ धीर गंभीर उदार सुशीळ ॥ कीर्तीने भरले दिग्मंडळ ॥ सात्त्विक केवळ क्षमावंत ॥१६॥ तेणे घातले अन्नसत्र ॥ झाली वर्षे दहा सहस्त्र ॥ इच्छाभोजन दान पवित्र ॥ अतीताप्रति देतसे ॥१७॥ अवनी जे अगम्य वस्त ॥ भोजनी मागीतली अकस्मात ॥ ती प्रयत्ने आणोनि पुरवीत ॥ शिवभक्त थोर तो ॥१८॥ ऐसे नारदे सांगता वर्तमान ॥ त्याच्या गृहाप्रति पंचवदन ॥ कुश्चळ अतीतवषे धरून ॥ येता झाला ते समयी ॥१९॥ आंगणी उभा ठाकला येऊन ॥ परम कोपी जेवी दावाग्न ॥ दुष्ट वचन बोले कठिण ॥ रूपही संपूर्ण कुश्चळचि ॥१२०॥ म्हणे मज देई इच्छा भोजन ॥ नातरी जातो सत्त्व घेवोन ॥ श्रियाळ चांगुणा येवोन ॥ पाय धरिती सद्भावे ॥२१॥ आणोनि बैसविला आसनी ॥ त्याची क्रोधवचने सोसूनी ॥ षोडशोपचारे पूजा करोनी ॥ कर जोडोनि ठाकती पुढे ॥२२॥ मागा स्वामी इच्छाभोजन ॥ येरू म्हणे नरमांस देई आणोन ॥ तू चोर हेर आणिसी धरून ॥ त्याचे मांस न घे मी ॥२३॥ धरूनि माझा उद्देश ॥ विकत आणिसील मनुष्य ॥ ते न घे मी निःशेष ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥२४॥ चांगुणा म्हणे कर जोडून ॥ मी आपुले मांस देते करी भोजन ॥ श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण ॥ माझे मांस देतो मी ॥२५॥ येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्त्वता ॥ परी सर्व याचकांचे मातापिता ॥ तुम्हा दोघांसी भक्षिता ॥ अन्नसत्र खंडेल ॥२६॥ तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ ॥ पांच वर्षांचा चिलया बाळ ॥ बत्तीसलक्षणी वेल्हाळ ॥ तो मज देई भोजना ॥२७॥ ऐसे ऐकता वचन ॥ मायामोहजाळ दूर करून ॥ म्हणती अवश्य जा घेवोन ॥ मग सदाशिव बोलत ॥२८॥ मी काय आहे वृक व्याघ्र रीस ॥ भक्षू तव पुत्राचे मांस ॥ उबग न मानूनि विशेष ॥ पचवूनि घाली मज आता ॥२९॥ मायामोह धरून ॥ कोणी करील जरी रुदन ॥ तरी मी जाईन उठोन ॥ सत्त्व घेवोनि तुमचे ॥१३०॥ अवश्य म्हणोनि पतिव्रता ॥ उभी ठाकोनि बाहे निजसुता ॥ म्हणे बाळा चिलया गुणवंता ॥ खेळावया कोठे गेलासी ॥३१॥ तुजलागी खोळंबला अतीत ॥ बाळा माया येई धावत ॥ ऐसे ऐकता अकस्मात ॥ बाळ आला धावोनी ॥३२॥ अतीतासी करूनि नमन ॥ मातापितयांचे धरी चरण ॥ माता म्हणे तुझे पिशितदान ॥ अतीत मागतो राजसा ॥३३॥ बाळ बोले स्नेहेकरून ॥ हा देह म्या केला शिवार्पण ॥ अतीत होता तृप्त पूर्ण ॥ उमारमण संतोषेल ॥३४॥ ऐसे ऐकता झडकरी ॥ बाळ घेतला कडियेवरी ॥ पाकशाळेभीतरी ॥ घेवोनि गेली वधावया ॥३५॥ चिलयासी चुंबन देऊन ॥ ह्रदयी धरिला प्रीतीकरून ॥ बाळ म्हणे पुढती येईन ॥ तुझ्या उदरा जननीये ॥३६॥ मायाजाळ सर्व सोडून ॥ मन केले वज्राहूनि कठिण ॥ चिलयाचे शिर छेदून ॥ काढिले मांस आंगीचे ॥३७॥ आपणांसी पुत्र नाही म्हणोनिया ॥ शिरकमळ ठेविले पहावया ॥ शरीराचा पाक करूनिया ॥ उठवी भोजना अतीताते ॥३८॥ अतींद्रियद्रष्टा श्रीशंकर ॥ अनंत ब्रह्मांडाचा समाचार ॥ सर्व ठाऊक सूत्रधार ॥ कळले शिर ठेविले ते ॥३९॥ उठोनि चालिला तात्काळ ॥ धावती चांगुणा श्रियाळ ॥ येरू म्हणे कळले सकळ ॥ शिरकमळ ठेविले ॥१४०॥ सर्व गात्रांत शिर प्रधान ॥ तेचि कैसे ठेविले वंचून ॥ तव ती दोघे धरिती चरण ॥ तेही पचवून घालितो ॥४१॥ क्षोभ न धरावा अंतरी ॥ नेणतपणे चुकलो जरी ॥ तरी सर्वज्ञा तू क्षमा करी ॥ सत्त्व आमुचे राखावे ॥४२॥ मग बैसला आसनी येऊन ॥ म्हणे शिर येई बाहेर घेऊन ॥ उखळात घालूनि कांडण ॥ मजदेखता करी आता ॥४३॥ अश्रु आलिया तुझ्या नयनी ॥ की कष्टी झालिया अंतःकरणी ॥ तरी पुत्र गेला सत्त्वासी हानी ॥ करून जाईन तुमच्या ॥४४॥ अवश्य म्हणे नृपललना ॥ शिर आणोनि करी कांडणा ॥ सत्त्व पाहे कैलासराणा ॥ अंतरी सद्गद होऊनी ॥४५॥ निजसत्त्वाचे उखळ ॥ धरिले धैर्याचे करी मुसळ ॥ कांडीत बैसली वेल्हाळ ॥ निर्धार अचळ धरूनिया ॥४६॥ अतीत म्हणे परम मंगळ ॥ गीत गाय रसिक सुढाळ ॥ खंती करिता पयःफेनधवल ॥ दुरावेल जाण पा ॥४७॥ ते सद्भावसरोवरविलासिनी ॥ कोमलह्रदय नृपकामिनी ॥ की निश्चळ गंगा भरूनी ॥ जात मर्यादा धरूनिया ॥४८॥ तिचे पाहता निजवदन ॥ काळवंडला रोहिणीरमण ॥ मृगशावाक्षी गुणनिधान ॥ उपमा नाही स्वरूपाते ॥४९॥ म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा ॥ सुलक्षणा सुशाला नृपकिशोरा ॥ सुहास्यवक्रा राजीवनेत्रा येवोनि उदरा धन्य केले ॥१५०॥ तू सुकुमार परम गुणवंता ॥ माझे निष्ठुर घाव लागती माथा ॥ तुजविण परदेशी आता ॥ दुबळि भणंग झाले मी ॥५१॥ कुचकमंडली अतिसुंदरा ॥ कंचुकीबाहेर फुटल्या दुग्धधारा ॥ की भूमिलिंगासी एकसरा ॥ गळत्या लाविल्या तियेने ॥५२॥ म्हणे अतीत जेवोनि अवधारी ॥ जाऊ दे राजद्वाराबाहेरी ॥ देह त्यागीन ये अवसरी ॥ यावरी धीर न धरवे पै ॥५३॥ कैलासपंथ लक्षून ॥ सखया एकला जातोसी मज टाकून ॥ तुझे संगती मी येईन ॥ उभा राहे क्षणभरी ॥५४॥ तू मोक्षद्वीपाचे केणे भरून ॥ जासी कैलासराजपेठ लक्षून ॥ तुझे संगती मी उद्धरेन ॥ मज टाकूनि जाऊ नको ॥५५॥ उदकाविन जैसा मीन ॥ तैसी मी तान्हया तुजविण ॥ माझे ह्रदय निर्दय कठीण ॥ लोकात वदन केवी दावू ॥५६॥ तुझी माउली मि म्हणता ॥ लाज वाटे रे गुणवंता ॥ तुवा आपुली सार्थकता ॥ करूनि गेलासी शिवपदा ॥५७॥ हे त्रिभुवन शोधिता सकळ ॥ तुजऐसा न दिसे बाळ ॥ मग ते पचवूनि तात्काळ ॥ उठा म्हणे अतीताते ॥५८॥ अतीत म्हणे अवनीपती ॥ उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ॥ ऐसे ऐकता श्रियाळनृपती ॥ झाला चित्ती संकोचित ॥५९॥ चांगुणा म्हणे नृपनाथा ॥ सत्त्व राखावे सत्वर आता ॥ विन्मुख जाऊ न द्यावे अतीता ॥ मनी चिंता न धरावी ॥१६०॥ नव मास वाहिला म्या उदरात ॥ तुम्हासी जड नव्हे चौप्रहरात ॥ पोटींचा पोटी घालिता सुत ॥ चिंता काय नृपश्रेष्ठा ॥६१॥ राव बैसला पंक्तीसी ॥ ताट वाढोनि आणिले वेगेसी ॥ अतीत म्हणे चांगुणेसी ॥ तुही येई सवेग ॥६२॥ अवश्य म्हणोनि झडकरी ॥ येवोनि बैसली नृपसुंदरी ॥ यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी ॥ अन्न न घ्यावे सर्वथा ॥६३॥ निपुत्रिकांचे न पहावे वदन ॥ मग तेथे कोण घेईल अन्न ॥ दीपेविण शून्य सदन ॥ पुत्राविण तेवी तुम्ही ॥६४॥ नासिकेवाचोनि वदन ॥ की वृक्ष जैसा फळाविण ॥ की बुबुळाविण जैसे नयन ॥ शून्य सदन तुमचे तेवी ॥६५॥ तव ती बोले सद्गदित ॥ एक होता तो अर्पिला सुत ॥ चांगुणा म्हणे गेले सत्त्व ॥ अतीत विन्मुख जाईल आता ॥६६॥ एक बाळ तो दिधला भोजनासी ॥ आता महाराजा सत्त्व किती पाहासी ॥ ऐसे बोलता चांगुणेसी ॥ अद्भुत गहिवर दाटला ॥६७॥ म्हणे सत्त्वही बुडाले सकळ ॥ वृथा गेले माझे बाळ ॥ मग कंठ मोकळा करूनि ते स्नेहाळ ॥ हाक फोडी चांगुणा ॥६८॥ नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा ॥ म्हणे अहा शिव कर्पूरगौरा ॥ दीर्घस्वरे बाहे उमावरा ॥ पाव सत्वरी या आकांती ॥६९॥ अहा झाले वंशखंडण ॥ न देखो पुढती पुत्रवदन ॥ ऐसे ऐकता अतीताचे नयन ॥ स्रवो लागले प्रेमभरे ॥१७०॥ बाहेर फुटली मात ॥ वळसा होत नगरांत ॥ लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत ॥ राजकिशोर आठवूनी ॥७१॥ विमानी दाटले सुरवर ॥ म्हणती धन्य पतिव्रता सत्त्वधीर ॥ ईस प्रसन्न होवोनि श्रीशंकर ॥ काय देईल ते न कळेचि ॥७२॥ अतीत म्हणे चांगुणेसी ॥ जे प्रिय असेल तुझे मानसी ॥ ते मजसी माग सद्गुणराशी ॥ यावरी सती काय बोले ॥७३॥ मज निपुत्रिक म्हणतील लोक ॥ हा धुवोनि काढी कलंक ॥ ऐसे ऐकता कैलासनायक ॥ बोलवी म्हणे पुत्रासी ॥७४॥ सत्य मानूनि अतीतवचना ॥ दीर्घ हाका फोडीत चांगुणा ॥ म्हणे चिलया गुणनिधाना ॥ येई स्नेहाळ धावोनी ॥७५॥ अतीत तुजविण न घे ग्रास ॥ कोठे गुंतलासी खेळावयास ॥ माझे तान्हे तू पाडस ॥ सत्त्व राखे येवोनिया ॥७६॥ तू न येसी जरी धावोन ॥ तरी माझा जाऊ पाहे प्राण ॥ दशदिशा विलोकून ॥ चांगुणा पाहे तेधवा ॥७७॥ मागुती हाक फोडी वेल्हाळ ॥ तो जैसे उगवे मित्रमंडळ ॥ तैसा धावतचि आला बाळ ॥ पाहे श्रियाळ स्नेहभरे ॥७८॥ अतीतस्वरूप टाकून ॥ शिवप्रगटला निजरूप पूर्ण ॥ दशहस्त पंचवचन ॥ दीनोद्धारण जगद्गुरू ॥७९॥ चिलया शिवे ह्रदयी धरिला ॥ निजअंकावरी बैसविला ॥ श्रियाळचांगुणा ते वेळा ॥ पायावरी लोळती ॥१८०॥ सुरवर सुमने वर्षती अपार ॥ दुंदुभिनादे कोंदले अंबर ॥ आनंदमय झाले नगर ॥ धावती लोक पहावया ॥८१॥ शिवे आणविले दिव्य विमान ॥ श्रियाळचांगुणा दिव्यरूप होऊन ॥ चिलयासी सिंहासनी स्थापून ॥ छत्र धरिले तयावरी ॥८२॥ सचिवांसी निरवोनि राज्यभार ॥ विमानी बैसली सत्वर ॥ निजपदी जगदुद्धार ॥ श्रीशंकर स्थापी तया ॥८३॥ कांतिनगरी सौख्य अगाध ॥ त्रिभुवनी न माये आनंद ॥ श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद ॥ अभंग न विटे कालत्रयी ॥८४॥ शिवलीलामृत ग्रंथ ॥ झाला चतुर्दश अध्यायपर्यंत ॥ चौदा भुवनांचे सार यथार्थ ॥ चौदा अध्याय निर्मिले ॥८५॥ की चौदा विद्यांचे सार ॥ चौदा गाठींचा अनंत परिकर ॥ की चौदा पदे निरंतर ॥ गयावर्जन घड हे ॥८६॥ की चतुर्दश रत्नांचा प्रकाश ॥ येथेंचि झाला एकरस ॥ की चौदा चक्रे निःशेष ॥ प्रिय चौदाही लोकांते ॥८७॥ की चौदा कांडे वेद ॥ की चौदा कोहळी द्रव्य प्रसिद्ध ॥ की चौदा कोठड्या शुद्ध ॥ शिवमंदिर निर्मिले ॥८८॥ श्रवण पठण लेखन ॥ निदिध्यास अनुमोदन ॥ परम प्रीती करिता ग्रंथरक्षण ॥ फल समान सर्वांसी ॥८९॥ इतुक्यांशी शिव होऊनि माउली ॥ करील निजांगाची साउली ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ॥ ग्रंथश्रवणे प्राप्त होय ॥१९०॥ आधि व्याधि जाय निरसोन ॥ वंध्याही पावे पुत्रसंतान ॥ ग्रामा गेला बहुत दिन ॥ पिता बंधु भेटेल ॥९१॥ घरी संपत्ति दाटे बहुत ॥ ऋणमोचन होय त्वरित ॥ क्षत्रुक्षय यथार्थ ॥ दक्षिणमुखे वाचिता ॥९२॥ शत आवर्तने करिता भक्तियुक्त ॥ पोटी होय शिवभक्त सुत ॥ ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ ॥ पिशाच भूत न रिघे तेथे ॥९३॥ त्रिमास करिता नित्य आवर्तन ॥ सर्व संकटे जाती निरसोन ॥ भावे प्रचीत पहावी वाचोन ॥ नाही कारण अभाविकांचे ॥९४॥ सोमवारी ग्रंथ पुजून ॥ अथवा प्रदोषकाळ शिवरात्रि लक्षून ॥ शुचिर्भूत होऊनि करावे शयन ॥ स्वप्नी प्रगटोन शिव सांगे ॥९५॥ जे जे पडेल संकट ॥ ते ते निवारील नीलकंठ ॥ चौदा अध्यायांचे फळ वरिष्ठ ॥ वेगळाले लिहिले असे ॥९६॥ प्रथमाध्यायी मंगलाचरण ॥ दाशार्हरायाचे आख्यान ॥ कलावतीने पति उद्धरिला पूर्ण ॥ हेचि कथन निर्धारे ॥९७॥ द्वितीयाध्यायी निरूपण ॥ शिवरात्रिकर्मविपाककथन ॥ तिसर्यात गौतम कथा सांगोन ॥ कल्पाषपाद उद्धरिला ॥९८॥ चौथ्यात महाकाळलिंगार्चन ॥ गोपबाळ गेला उद्धरून ॥ पाचव्यात उमेने पुत्र पाळून ॥ राज्यी स्थापिला शिवप्रसादे ॥९९॥ सहावा अध्याय अतिरसिक ॥ सीमंतिनी आख्यान पुण्यकारक ॥ सातवा आठवा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पै ॥२००॥ नवमात वामदेवाचे आख्यान सुरस ॥ दुर्जयराजा झाला राक्षस ॥ जन्मदुःखे कथिली बहुवस ॥ अतिसुरस अध्याय तो ॥१॥ दहाव्यात शारदा आख्यान ॥ अकराव्यात रुद्राक्षमहिमा पूर्ण ॥ महानंदा गेली उद्धरोन ॥ भद्रसेन राव तरला ॥२॥ बाराव्यात विदुरबहुलाद्धार ॥ विष्णूने मर्दिला भस्मासूर ॥ तेराव्या अध्यायात समग्र ॥ शिवगौरीविवाह पै ॥३॥ चौदाव्यात शिवअपर्णाविनोद ॥ गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध ॥ पुढे श्रियाळचरित्र अगाध ॥ चौदावा अध्याय संपूर्ण हा ॥४॥ श्रीधरस्वामी ब्रह्मानंद ॥ आनंदसांप्रदाय परम अगाध ॥ क्षीरसागरी गोविंद ॥ आधी उपदेशी कमलोद्भवा ॥५॥ तेथूनी अत्रिऋषि प्रसिद्ध ॥ पुढे पूर्णब्रह्म दत्तात्रेय अगाध ॥ त्यापासूनि सदानंद ॥ रामानंद यती तेथोनि ॥६॥ तेथोनि अमलानंद गंभीर ॥ मग ब्रह्मानंद उदार ॥ त्यावरी कल्याणी राहणार ॥ सहजानंद यतींद्र पै ॥७॥ तेथूनि पूर्णानंद यती शुद्ध ॥ त्यापासाव पितामह दत्तानंद ॥ पिता तोचि सद्गुरु प्रसिद्ध ॥ ब्रह्मानंद यतींद्र जो ॥८॥ पंढरीहून चारी योजने दूरी ॥ नैऋत्यकोणी नाझरे नगरी ॥ तेथील देशलेखक निर्धारी ॥ पूर्वाश्रमी ब्रह्मानंद ॥९॥ पुढे पंढरीसी येऊन ॥ केले तेथे संन्यासग्रहण ॥ तेथेंच समाधिस्थ होऊन ॥ अक्षय वस्ती केली पै ॥२१०॥ तो ब्रह्मानंद माझा पिता ॥ सावित्री नामे माझी माता ॥ वंदूनि त्या उभयता ॥ शिवलीलामृत ग्रंथ संपविला ॥११॥ शके सोळाशे चाळीस ॥ विलंबीनाम संवत्सरास ॥ शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास ॥ रविवारी ग्रंथ संपविला ॥१२॥ ब्रह्मकमंडलूच्या तीरी ॥ द्वादशमती नाम नगरी ॥ आद्यंत ग्रंथ निर्धारी ॥ तेथेचि झाला जाणिजे ॥१३॥ शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत ॥ चतुर्दश अध्यायापर्यंत ॥ जय जय शंकर उमानाथ ॥ तुजप्रीत्यर्थ हो का सदा ॥१४॥ अपर्णाजीवना कर्पूरगौरा ॥ ब्रह्मानंदा जगदुद्धारा ॥ श्रीधरह्रदयाब्जभ्रमरा ॥ अक्षय अभंगा दयानिधे ॥१५॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड ॥ सदा परिसोत सज्जन अखंड ॥ चतुर्दशाध्याय गोड हा ॥२१६॥
॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु॥॥शुभं भवतु॥

Search

Search here.