नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या 

स्तोत्र - मंत्र  > संकीर्ण इतर स्तोत्र Posted at 2018-11-29 14:57:17
नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या ज्यांना पूर्ण शिवलीलामृत ग्रंथ वाचण्यास वेळ नसेल त्यांनी या ४२ ओव्या नित्य नियमाने सश्रद्ध म्हंटल्यास शिवकृपेने अनेक संकटे , गंडांतरे , अरिष्ट बाधा पीडा नष्ट होऊन सुख - यश प्राप्त होते.. सोमवार किंवा शिवरात्री पासून सुरू केल्यास उत्तम... किंवा जे प्रदोष व्रत किंवा सोमवार करतात त्यांनी सुद्धा त्यादिवशी हे म्हणल्यास उत्तम... ऊँ श्री गणेशाय नमः । ऊँ नमः शिवाय । ॐ नमोजी अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्ण ब्रह्मानंदा शाश्र्वता । हेरंबतात जगद्गुरु ॥ १ ॥ ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ २ ॥ जयजय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । मनोजदमनी मनमोहना । कर्ममोचका विश्र्वभरा ॥ ३ ॥ जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण । नाना संकटें विघ्नें दारुण । न बाधती कालत्रयीं ॥ ४ ॥ संकेतें अथवा हास्येंकरुन । भलत्या मिषें घडो शिवस्मरण । न कळतां परिस लोहालागुन । झगटतां सुवर्ण करीतसे ॥ ५ ॥ न कळतां प्राशितां अमृत । अमर काया होय यथार्थ । औषध नेणतां भक्षित । परी रोग हरे तत्काळ ॥ ६ ॥ जय जय मंगलधामा । निजजनतारका आत्मारामा । चराचरफलांकित कल्पद्रुमा । नामा अनामा अतीता ॥ ७ ॥ हिमाचलसुतामनरंजना । स्कंदजनका शफरीध्वजदहना । ब्रह्मानंदा भाललोचना । भवभंजन महेश्वर ॥ ८ ॥ हे वामदेवा अघोरा । तत्पुरुषा ईशाना ईश्र्वरा । अर्धनारीनटेश्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥ ९ ॥ धराधरेंद्र मानससरोवरीं । तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारीं । तव अपार गुणांसी परोपरी । सर्वदा वर्णिती आम्नाय ॥ १० ॥ न कळे तुझें आदिमध्यावसान । आपणचि सर्वकर्ता कारण । कोठें प्रगटशी याचें अनुमान । ठायीं न पडे ब्रह्मांदिका ॥ ११ ॥ जाणोनि भक्तांचे मानस । तेथेंचि प्रगटशी जगन्निवास । सर्वकाळ भक्तकार्यास । स्वांगे उडी घालिसी ॥ १२ ॥ ' सदाशिव ' ही अक्षरें चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी । तो परमपावन संसारी । होऊनि तारी इतरांतें ॥ १३ ॥ बहुत शास्रवक्ते नर । प्रायश्चित्तांचा करितां विचार । परी शिवनाम एक पवित्र । सर्व प्रायश्र्चित्तां आगळें ॥ १४ ॥ नामाचा महिमा अद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत । त्यासी सर्व सिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १५ ॥ जय जयाची पचंवदना । महापापद्रुमनिकृंतना । मदमत्सरकाननदहना । निरंजना भवहारका ॥ १६ ॥ हिमाद्रिजामाता गंगाधरा । सुहास्यवदना कर्पूरगौरा । पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥ १७ ॥ नीलग्रीवा अहिभूषणा । नंदिवाहना अंधकमर्दना । दक्षप्रजापतिमखभंजना । दानवदमना दयानिधे ॥ १८ ॥ जय जय किशोर चंद्रशेखरा । उर्वी धरेंद्रनंदिनीवरा । त्रिपुरमर्दना कैलासविहारा । तुझ्या लीला विचित्र ॥ १९ ॥ कोटि भानुतेजा अपरिमिता । विश्र्वव्यापका विश्र्वनाथा । समाधिप्रिया भूतादिनाथा । मूर्तामूर्तत्रयीमूर्ते ॥ २० ॥ परमानंदा परमपवित्रा । परात्परा पंचदशनेत्रा । पशुपते पयः फेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥ २१ ॥ जय जय श्रीब्रह्मानंदमूर्ति । तू वंद्य भोळा चक्रवर्ति । शिवयोगीरुपें भद्रायूप्रती । अगाध नीति कथिलीस ॥ २२ ॥ जय जय भस्मोद्धूलितांगा । योगध्येया भक्तभवभंगा । सकलजनआराध्यलिंगा । नेईं वेगीं तुजपाशीं ॥ २३ ॥ जेथें नाही शिवाचें नाम । तो धिक् ग्राम धिक् आश्रम । धिक् गृह पर उत्तम । आणि दानधर्मा धिक्कार ॥ २४ ॥ जेथें शिवनामाचा उच्चार । तेथें कैंचा जन्ममृत्युसंसार । ज्यासी शिव शिव छंद निरंतर । त्यांहीं जिंकिलें कळिकाळा ॥ २५ ॥ जयाची शिवनामीं भक्ति । तयाचीं पापें सर्व जळती । आणि चुके पुनरावृत्ति । तो केवळ शिवरुप ॥ २६ ॥ जैसें प्राणियाचें चित्त । विषयीं गुंते अहोरात्र । तैसें शिवनामीं लागत । तरी मग बंधन कैचें ॥ २७ ॥ कामगजविदारकपंचानना । क्रोधजलप्रभंजना । लोभांधकार चंडकिरणा । धर्मवर्धना दशभुजा ॥ २८ ॥ मत्सरविपिनकृशाना । दंभनगभेदका सहस्रनयना । लोभ महासागरशोषणा । अगस्त्यमहामुवर्या ॥ २९ ॥ आनंदकैलासविहारा । निगमागमवंद्या दीनोद्धारा । रुडंमालांकितशरीरा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥ ३० ॥ धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण । सदा शिवलीलामृत पठण । किंवा श्रवण करिती पैं ॥ ३१ ॥ सूत सांगे शौनकांप्रति । जे भस्मरुद्राक्ष धारण करिती । त्यांच्या पुण्यासि नाहीं गणती । त्रिजगतीं धन्य ते ॥ ३२ ॥ जे करिती रुद्राक्ष धारण । त्यांसी वंदिती शक्र द्रुहिण । केवळ तयांचे घेतां दर्शन । तरती जन तत्काळ ॥ ३३ ॥ ब्राह्मणादि चारी वर्ण । ब्रह्मचर्यादि आश्रमीं संपूर्ण । स्त्री बाल वृद्ध आणि तरुण । यांहीं शिवकीर्तन करावें ॥ ३४ ॥ शिवकीर्तन नावडे अणुमात्र । ते अत्यंत जाणूनि अपवित्र । लेइले नाना वस्त्रालंकार । तरी केवळ प्रेतचि ॥ ३५ ॥ जरी भक्षिती मिष्टान्न । तरी ते केवळ पशूसमान । मयूरांगींचे व्यर्थ नयन । तैसे नेत्र तयांचे ॥ ३६ ॥ शिव शिव म्हणतां वाचें । मूळ न राहे पापाचें । ऐसें माहात्म शंकराचें । निगमागम वर्णिती ॥ ३७ ॥ जो जगदात्मा सदाशिव । ज्यासि वंदितीं कमलोद्भव । गजास्य इंद्र माधव । आणि नारदादि योगींद्र ॥ ३८ ॥ जो जगद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाह्रदयाब्जमिलिंद । शुद्ध चैतन्य जगदादिकद । विश्र्वंभर दयाब्धी ॥ ३९ ॥ जो पंचमुख दशनयन । भार्गववरद भक्तजीवन । अघोर भस्मसुरमर्दन । भेदातीत भूतपति ॥ ४० ॥ तो तूं स्वजन भद्रकारका । संकटीं रक्षिसी भोळे भाविकां । ऐसी कीर्ति अलोलिका । गाजतसे ब्रह्मांडी ॥ ४१ ॥ म्हणोनि भावें तुजलागून । शरण रिघालों असें मी दीन । तरी या संकटांतून काढुनि पूर्ण संरक्षी ॥ ४२ ॥ ऊँ श्री शिवार्पणमस्तु । ऊँ नमः शिवाय । ॥ नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त ॥

Search

Search here.