युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
आरती > विठ्ठल आरती Posted at 2018-03-29 14:23:41
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा
चरणी वाहे भिमा उद्धारी जगा ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा जयदेव जयदेव ।। ध्रु॰ ।।
तुळसीमाळा गळा कर ठेवूनि कटी
कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटि
गरुड हनुमंत पुढे उभे राहती ।। जय. ।। २ ।।
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळीती राजा विठोबा सावळा ।। जय. ।। ३ ।।
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती
दिंड्या पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय. ।। ४ ।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। जय. ।। ५ ।।
Search
Search here.