योगीश्वर याज्ञवल्क्य

श्याम जोशी ब्लॉग Posted at 2016-03-13 03:53:55

योगीश्वर श्री याज्ञवल्क्य यांच्या विषयी थोड़ी माहिती मला द्यायला सांगितली होती .. तसे फोन आले होते तसेच ग्रुप वर लिहिन्यात आले होते .. त्या प्रमाणे गुरुजनांना साष्टांग नमस्कार करुन मी माझ्या तोकड्या बुद्धिने स्वतः लिहिलेला एक लेख देत आहे ... कृपा करून स्वीकार करा .. यात जे काही चांगले आहे ते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि काही चूक असेल तर ती सर्वस्वी माझी आहे , त्यामुळे तुम्ही मला चूक सुधारन्यासाठी मार्गदर्शन कराल ही नम्र विनंती ..???

[23/02/2015 20:14] shyam joshi guruji: याज्ञवल्क्यो मुनि: श्रेष्ठो । शुक्ल वेदस्य स्थापक: ॥ सूर्यशिष्यो महातेजा । याज्ञवल्क्यं नमाम्यहम् ॥१॥ ॥ ॐ नमो भगवते वाजसनेयाय याज्ञवल्क्याय ॥ याज्ञवल्क्य यांची थोड़ी माहिती द्यावी असा फोन आला आणि माझी धड़कीच् भरली .. मी एक क्षुद्र काजवा , तो सुद्धा परप्रकाशीत मग मी काय लिहु शकणार या सूर्याचे गुणवर्णन ... तरी ऋणकर्तव्य म्हणून एक प्रयत्न ... सर्व जगताला गायत्री मन्त्र राज प्रदान करणाऱ्या विश्वामित्र कुलातील देवरात किंवा ब्रह्मरात या श्रेष्ठ ऋषींचे श्रेष्ठ सुपुत्र म्हणजे योगीश्वर याज्ञवल्क्य... ( भागवत , मत्स्य पुराण ) " उपनिषद काळातील अध्यात्म विद्येचा सर्वश्रेष्ठ आचार्य " असे गौरविल्या जाणाऱ्या उद्दालक आरुणि यांचा श्वेतकेतु आणि कौषीतकि यांच्या बरोबर विद्यार्जन घेणारा सर्वश्रेष्ठ व प्रिय शिष्य याज्ञवल्क्य , ज्याने जनक राजाच्या यज्ञामधे अश्वल , आर्तभाग , भुज्यु , उषस्त , कहोल , शाकल्य , ब्रह्मवादिनी गार्गी या सर्व विद्वत आचार्यांसह आपल्या गुरुचा म्हणजे उद्दालक आरुणि यांचा सुद्धा ब्रह्मज्ञान विषयी च्या झालेल्या प्रश्न चर्चेत हरवले आणि " शिष्यात् इच्छेत् पराजयम् " ही उक्ति सत्य ठरवून स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आणि ब्रह्मज्ञान या मधे अत्युच्च स्थान प्राप्त केले.. जनकाच्या व इतर अनेक विद्वान ऋषिश्रेष्ठांच्या सर्व प्रश्नांना अत्यंत समर्पक योग्य उत्तरे देऊन शुद्ध ज्ञान आणि आत्म बोध पर ज्ञान प्रकट केले ... आसुरी आणि बौधेय हे याचे शिष्य सुद्धा असेच ब्रह्मज्ञानी होते .. महर्षि वैशम्पायन यांच्या कड़े वेद विद्यार्जन करीत असताना काही विवाद झाल्या मुळे रुष्ट झालेल्या यांनी शिकलेले सर्व ज्ञान आपल्या बुद्धितुन ओकुन टाकले म्हणजेच परत कुठेही न वापरन्याचे अभिवचन दिले आणि पुनः ज्ञान प्राप्तिसाठी सूर्य आराधना केली .. ओकुन टाकलेले ज्ञान इतर शिष्यानी सहपाठ्यानी तितर पक्षी बनून ग्रहण केले म्हणून त्या नंतर त्या शाखेला तैत्तिरीय शाखा म्हणून ओळखले जाऊ लागले .. सूर्याराधना करत त्यानी सूर्याला प्रार्थना केलि - " अहमयातयामयजु:काम उपसरामीति " आणि सूर्यदेव प्रसन्न होऊन यांच्यासमोर अश्व रूप घेऊन सर्व प्रकारचे ज्ञान आणि वैशम्पायन यांना सुद्धा अज्ञात असलेले " अयातयाम् " अशी श्रेष्ठ विद्या ज्ञान यांना दिले .. || एवम् स्तुतः स भगवान् वाजिरूपधरोहरिः यजूंष्ययातयामानि मुनयेsदात् प्रसादित: || अश्वरूप सूर्या पासून प्राप्त झाल्या मुळेच ही वेदज्ञान शाखा शुक्लयजुर्वेद मधे " वाजसनेयी " आणि " माध्यन्दिन " ओळखलि जाऊ लागली .. या शाखे मधे समग्र यज्ञकर्म चे विस्तृत मन्त्र कारिका त्यांनी दिली ... यज्ञाचा अध्वर्यु यजुर्वेदी असावा असे पहिले नियमन होते म्हणून या वेदाला अध्वर्यु वेद सुद्धा म्हंटले जाते ... तसेच या वेदामधे ईश्वर संकल्पना , नव विधा भक्ती , भक्त , नीती , सदाचार या विविध विषयांचा सुद्धा अंतर्भाव आहे .. यज्ञमन्त्र , यज्ञाचे कर्मकाण्ड , उपासना , नियम , शास्त्रवत् विधी या सर्वांचा शुद्ध संग्रह म्हणजे यजुर्वेद होय .. या शुक्ल यजुर्वेद चाच 40 वा अध्याय हा ईशावास्य उपनिषद म्हणून ओळखले जाऊ लागले .. आकाराने सर्वात लहान परंतु अत्यंत आशयघन आणि आशयगर्भ असलेले ब्रह्मविद्या आणि आत्मज्ञान या विषयीचे सर्व सार या मधे आहे ... त्याचप्रमाणे वरील सर्व विषयांचे बारीक सारिक ज्ञान तसेच अनेक कर्मांचा अत्यंत विस्तृत तपशील सर्वाना प्राप्त व्हावा या साठी यांनी " शतपथ ब्राह्मण " हा 14 काण्ड 100 अध्याय 68 प्रपाठक 438 ब्राह्मणे अणि 7624 कण्डिका असलेला विस्तृत ग्रन्थ रचला .. बृहदारण्यकोपनिषद् हे या शतपथचेच एक सारांश रूप आहे .. मैत्रेयी व कात्यायनी या दोन पत्नी पैकी मैत्रेयी या प्रिय पत्नीला यांनी पूर्ण असे आत्मज्ञान मोक्षज्ञान दिले आणि संसारातून पूर्णतः विरक्त झाले .. सर्व कर्मकाण्ड व मानवी जीवन या मधे सर्वांचे कसे आचरण असावे तसेच यम नियम या विषयी सर्व विस्तृत विवेचन असलेली याज्ञवल्क्य स्मृति ही 20 प्रमुख स्मृति ग्रंथांमधील एक प्रमुख आणि विशेष स्मृति म्हणून गणली गेली आहे . ज्या मधे आचाराध्याय , व्यवहाराध्याय , प्रायश्चित्ताध्याय असे नावा प्रमानेच विषय असलेले 3 मुख्य भाग आहेत .. गन्धर्व राज विश्वावसु याच्या सर्वच्या सर्व 24 प्रश्नांना अत्यंत समर्पक योग्य उत्तर देऊन यांनी त्याला प्रसन्न केले होते .. ( महा. शांति. 318. 26-84 ) विद्येची अधिष्ठात्री देवी सरस्वती यांना साक्षात प्रसन्न झाली होती असा सुद्धा उल्लेख आहे . ( महा. शांति . 318 - 14 ) युधिष्ठिराच्या राजसभेत सुद्धा या वंश कुळाला अत्यंत मान सन्मान होता .. ( महा. सभा. 4 - 12 ) साक्षात देवराज इंद्राच्या राजसभेत सुद्धा अत्यंत मान सन्मान प्राप्त असलेले याज्ञवल्क्य ऋषि हे तत्कालीन अनेक आचार्य कुलांना वंदनीय होते .. ( महा. सभा. 7 - 12 ) यांच्या विषयी अजुन काय लिहिनार ? साक्षात सूर्याचे स्वरूप असलेले याज्ञवल्कयांचे वर्णन मी काजवा कधीच करू शकणार नाही . || अयं तू परमो धर्मो यद्योगेनात्मदर्शनम् || ( याज्ञ. आचाराध्याय 122 ) आत्मज्ञान आणि मोक्षज्ञान हेच सदैव श्रेष्ठ आहे असे सदैव वदणार्या या पूर्णस्वरूप पूर्ण ब्रह्माचे मला आणि आपणा सर्वाना ज्ञान रूपी आशीर्वाद प्राप्त होवो हीच एक कामना .. || ॐ पूर्णमदः पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते  || ॐ शांतिः ! शांतिः !! शांतिः !!! © लेखक - श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा ज्योतिष आचार्य अभ्यासक प्राचीन इतिहास व कर्मकांड संशोधक वैदिक शास्त्र व आधुनिक विज्ञान ??? श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा

Search

Search here.