जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया

गजानन महाराज आरती २

जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवर जडमूढ ताराया ॥ जय०॥ धृ० ॥

निर्गुणब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी ।
ते तू तत्त्व खरोखर निःसंशय अससी ।
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ॥ जय०॥ १॥

होऊ न देशी त्याची जाणीव तू कवणा ।
करूनी “गणी गण गणात बोते” या भजना ।
धाता हरिहर गुरुवर तूचि सुखसदना ।
जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना ॥ २॥

लीला अनंत केल्या बंकटसदनास ।
पेटविले त्या अग्नीवाचूनि चिलमेस ।
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥ जय०॥ ३॥

व्याधी वारून केले कैकां सम्पन्न ।
करविले भक्तांलागी विठ्ठल दर्शन ।
भवसिन्धू हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥ जय०॥ ४॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!