लक्ष्मीकुबेर पूजन

लक्ष्मीपूजन लक्ष्मी – कुबेर पूजन

पूजा साहित्य –

गंध, अक्षता, हळदी-कुंकू, फुले पांढरी लाल पिवळी फुले , तुळशीपत्र , निरांजन , धूप , नागवेलीची पाने, सुकामेवा, कॉइन्स, कलश तांब्या, फळे, नैवेद्यास, पुरण पोळी, साळीच्या लाह्या, बत्ताशे, धने , खडीसाखर , फराळाचे पदार्थ इ.

पूजा मांडणी व पूर्वतयारी –

पूजेची वेळ सायंकाळी साधारण ५.३० नंतर ..

देव्हार्‍यासमोर एक मोठा चौरंग / पाट ठेवावा व त्यावर पूजेसाठी आणलेले नवीन वस्त्र अंथरावे. दोन तीन पाट घेतले तर उत्तमच म्हणजे अनेक वस्तू ठेवता येतात.

पाटावर स्वस्तिक काढावे, पाटावर डाव्या बाजुला लक्ष्मी नारायण यांची प्रतिमा ठेवावी, त्याच्या समोर दोन स्वतंत्र जोडपानांवर नवीन किंवा कोजागरी पौर्णिमेस वापरलेल्या देवी लक्ष्मी आणि कुबेर यांच्या सुपार्‍या ठेवाव्यात. सुपाऱ्या न ठेवता मूर्ती / प्रतिमा वगैरे सुद्धा चालेल. त्यानंतर दोन सुक्या खोबर्‍याच्या वाट्यांमध्ये अनुक्रमे खडीसाखर व बत्ताशे-साळीच्या लाह्या भराव्यात. त्यानंतर या दोन्ही वाट्या देवतांच्या समोर ठेवाव्यात.

लक्ष्मी नारायण यांच्या प्रतिमे शेजारी कुलदेवतेचा फोटो / मूर्ती / टाक ठेवावा.

त्याच्या समोरील बाजुस चार हत्तींनी युक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा कॉइन / नाणे ठेवावे, त्यासमोर एक नारळ ठेवावे. पैसे, सोने, चांदी, फळे, फराळाचे पदार्थ इ. चित्रात दर्शविल्या प्रमाणे त्या त्या ठिकाणी ठेवावे. पूजेच्या उजव्या बाजूस शंख तसेच डाव्या बाजूस घंटा ठेवावी, अशा पद्धतीने पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेशद्वार आणि तुळशी वृंदावना जवळ रांगोळी काढावी. तुळशीपासून पूजेच्या ठिकाणा पर्यंत रांगोळीने लक्ष्मी तसेच गायीची पावले काढावीत.
देवघर, प्रवेशद्वार, तसेच तुळशीजवळ पणत्या प्रज्वलित कराव्यात.
पूजेला सुरुवात करताना घरात तुपाचा दिवा व धूप लावावा, सर्वत्र गोमुत्र शिंपडावे. घरातील वातावरण शांत ठेवावे. टी.व्ही. टेप बंद ठेवावेत.
सायंकाळी ५.३० वा. पूजेस सुरुवात करावी. पूजेची सुरुवात तुलसी पूजनाने करावी.

प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून, हळद-कुंकू, अक्षता व फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करावी.
गंध, अक्षता, हळदी-कुंकू, फुले, धुप, दीप व खडीसाखरेचा नैवेद्य) यानंतर एक वेळा तुलसी स्तोत्र किंवा तुलसी मंत्र अकरा वेळा म्हणावा.

तुलसी स्तोत्र –

तुलसी सर्व व्रतानां महापातक नाशिनी। अपवर्ग प्रदे देवी वैष्णवानां प्रिय सदा
सत्ये सत्यवतीचैव त्रेताया मानवी तथा।
द्वापारे चावतीर्णासी वृन्दात्वं तुलसी कली:॥

तुलसी मंत्र –

“ॐ र्‍हीं क्लीं ऐं वृन्दावन्यै स्वाहा॥”
तसेच पूजेसाठी आणलेल्या नवीन केरसुणीची पंचोपचार पूजा करावी.
प्रवेशद्वाराची हळद-कुंकू वाहून पूजा करावी.

देवघरातील देवांची पूजा करावी ..

त्यानंतर महिलांनी स्वत:च्या कपाळाला हळद-कुंकू तर पुरुषांनी अष्टगंध लावावा.

भगवान विष्णूंच्या २४ नावांपैकी प्रथम तीन नावांनी पाणी प्राशन करावे व पुढील दोन नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे नंतर हात जोडून पुढील नावे म्हणावीत.

१) ॐ केशवाय नम:
२) ॐ नारायणाय नम:
३) ॐ माधवाय नम:
४) ॐ गोविंदाय नम:
५) ॐ विष्णवे नम:
६) ॐ मधुसुदनाय नम:
७) ॐ त्रिविक्रमाय नम:
८) ॐ वामनाय नम:
९) ॐ श्री धराय नम:
१०) ॐ ऋषिकेशाय नम:
११) ॐ पद्मनाभाय नम:
१२) ॐ दामोदराय नम:
१३) ॐ संकर्षणाय नम:
१४) ॐ वामनाय नम:
१५) ॐ प्रद्युम्नाय नम:
१६) ॐ अनिरुद्धाय नम:
१७) ॐ पुरुषोत्तमाय नम:
१८) ॐ अधोक्षजाय नम:
१९) ॐ नारसिंहाय नम:
२०) ॐ अच्युताय नम:
२१) ॐ जनार्दनाय नम:
२२) ॐ उपेंद्राय नम:
२३) ॐ हरये नम:
२४) ॐ श्रीकृष्ण परमात्मने नम:

नंतर शरीरशुद्धी साठी
नमो भगवते वासुदेवाय
किंवा
श्री कृष्णाय नमः
हा मन्त्र 8 / 11 वेळा म्हणावा .

त्यानंतर हातात पाणी घेऊन निम्नलिखित संकल्प म्हणावा , संस्क्रुत येत नसेल तर शुद्ध मराठीत प्रार्थना संकल्प करावा .

‘मी (अमुक) गोत्रात उत्पन्न (अमुक) नावाचा/नावाची व्यक्ती माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक, वाचिक, मानसिक दारिद्य्र निवारण होऊन क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, ऐश्वर्य, अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरू, आई-वडील यांची भक्ती, सेवा व सान्निध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश, कलह निवारण होऊन घरात, कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती, यथाज्ञानेन दीपावली निमित्त श्री लक्ष्मीपूजन करीत आहे.’
असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे.

त्यानंतर श्री गणेश ध्यानमंत्र म्हणावा

‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ:।

निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा॥’

त्यानंतर जमल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने देव्हार्‍यातील श्री गणेश मूर्ती वर अथर्वशीर्ष म्हणून किंवा गणेश स्तोत्र म्हणून अभिषेक करावा किंवा निदान स्तोत्र म्हणून फुल वगैरे अर्पण करावे.
व नंतर पूजेच्या कलशात गंगाजल , गंध, अक्षता, हळद-कुंकू, फुले वाहून गंगादी सप्त नद्यांचे स्मरण करत नमस्कार करावा.

‘ॐ पुण्डरीकाक्षाय नम:।’ म्हणत पूजेच्या तांब्यातील पाणी सर्व पूजा साहित्य व स्वत: वर शिंपडावे.

त्यानंतर फक्त कुलदेवतेच्या टाकावर दूध पाणी ने देवीस्तोत्र किंवा देवीचे नाव घेऊन अभिषेक करावा (टाक ताम्हणात घ्यावा) व नंतर पुसून जागेवर ठेवून गंध, अक्षता, हळद-कुंकू, फुले , बेलपत्र वाहून पूजन करावे.

त्यानंतर श्री लक्ष्मी ध्यान मंत्र म्हणावा

श्री लक्ष्मी ध्यान मंत्र –

ॐ कान्त्या कांचनसंन्निभां हिमगिरी प्रख्यैश्चतुभिर्गर्जे।
हस्तो त्क्षिप्त हिरण्मय अमृत घटै रासिंचमाना श्रियम्॥
विभ्राणां वरमब्जयुग्मभयं हस्तै; किरीटोज्ज्वलां।* क्षौमाबद्धनितम्बबिम्ब ललितां वंदेऽरविन्द्रस्थिताम्॥’

म्हणण्यास कठीण असेल तर ऊँ श्री महालक्ष्म्यै नमः एवढे म्हणून अक्षता अर्पण करणे.

त्यानंतर पूजा मांडणीतील सर्व देवतांचे गंध, अक्षता, हळद-कुंकू, फुले, तुळशी पत्र वाहून पूजन करावे, धूप दीप ओवाळावा व पुरणपोळीसह अन्नाचा तसेच लाह्या-बत्ताशे, फराळाचे पदार्थ, फळे इ. चा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर माता लक्ष्मीची प्रार्थना म्हणावी.

श्री लक्ष्मी प्रार्थना

‘त्रैलोक्यपूजिते देवी कमले विष्णूवल्लभे।
यथा त्वमचला कृष्णे तथा भव मयि स्थिरा॥

कमला चंचला लक्ष्मीश्चला भुतिर्हरिप्रिया।
पद्मा पद्मालया सम्यगुच्चै: श्रीपद्मधारिणी॥

धनदायै नमस्तुभ्यं निधी पद्मधिपायच। भूवन्तूत्वत्प्रसादान्मे धन धान्यादि संपदा॥’

त्यानंतर एक वेळा कोणतेही लक्ष्मी स्तोत्र , देवी सुक्त वाचावे व सप्तशती ग्रंथातील क्षमाप्रार्थना म्हणावी. वेगवेगळे स्तोत्र मन्त्र जप करावा..

त्यानंतर आरती करावी. श्रीगणपती, देवीची आरती वगैरे म्हणावी.
पूजेच्या समाप्ती नंतर अभिषेकाचे तीर्थ सर्व घरात शिंपडावे.

घरातील सर्व सदस्यांनी वेगवेगळी स्तोत्र म्हणावीत , जप नामस्मरण करावे .. कोणतेही पूजन करताना शुद्धता हवीच. शाकाहार असावा ..

अलक्ष्मी निस्सारण

या दिवशी घराची सर्व दारे, खिडक्या रात्री १२ वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात तसेच सर्व दिवे सुरू ठेवावेत. बरोबर रात्री १२ वाजता जुन्या केरसुणीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुणी न उचलता झाडत आणावे. केरसुणी उंबरठ्यावर आपटावी व तिचा एक फड तोडून बाहेर टाकावा. ही कृती करत असतांना ‘अलक्ष्मी नि:सारण’ म्हणावे.

( कोणी कोणी संध्याकाळी सर्व पूजनानंतर करतात .. आपापल्या रीती रिवाजानुसार पद्धतीनुसार कर्म करावे )

लक्ष्मीपूजन आपापल्या वेळेप्रमाणे सकाळी संध्याकाळी करावे . अनेक ठिकाणी शक्यतो संध्याकाळीच असते .

( करायला गेले तर खूप काही असते , पण सहज सोपे सर्वांना जमेल असे थोडक्यात जे महत्वाचे आहे ते दिले आहे )

दीपावलीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा ..

श्री श्याम जोशी गुरुजी व परिवार ..

2 thoughts on “लक्ष्मीकुबेर पूजन

    • November 14, 2020 at 12:42 pm
      Permalink

      thanks .. धन्यवाद .. शुभ दिपावली ..

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!