मारुती भजन स्तुती
मारुती भजन स्तुती
काय सांगु मी या मारुतीचें बळ । गिळिलें मंडळ मार्तंडाचें ॥१॥ मार्तंड गिळिला याने बाळपणीं । देवादिकां रणीं पिटियेलें ॥२॥ पिटिले राक्षस विध्वंसिलें बन । लंकेचें दहन क्षणमात्रें ॥३॥ क्षणमात्रें आला जानकी शोधुनी । सिंधु वोलांडुनी अवलीळा ॥४॥ अवलीळा जेणें द्रोणाद्रि आणिला । राक्षस वधिला काळनेमी ॥५॥ काळनेमी आणि मारिली विवसी । उद्धार तयेसी जीवदान ॥६॥ जीवदान दिलें तया लक्षुमणा । आणि कपिगणां सकळिकां ॥७॥ सकळिकां कपिकुळाचें मंडण । वांचविले प्राण बहुतांचे ॥८॥ बहुतांमधुनी तया राघवासी । नेलें पातळांसी निशाचरीं ॥९॥ निशाचरीं राम पाताळासी नेला । मागें धाविन्नला हनुमंत ॥१०॥ हनुमंतें उडी घातली संकटीं । सोडिलें सेवटीं स्वामियासी ॥११॥ स्वामियासी सोडी धन्य तो सेवक । कीर्ति अलोलिक मारुतीची ॥१२॥ मारुतीनें तये जानकीकारणें । नगरचि नेणें उचलोनी ॥१३॥ उचलोनी माथां तये जानकीसी । वाटे कुंभकासी वधावया ॥१४॥ वधुनीयां कुंभकर्णांचा नंदनु । पुन्हां बिभीषणु राज्यीं बैसे ॥१५॥ बैसला मारुति तये सिंधुतीरीं । हुंडारिलें दुरी गरुडासी ॥१६॥ गरुडाची हांव सर्वही यादव । फेडियेला गर्व एकसरां ॥१७॥ एकसरां नामेंरुपें पालटिला । मग रक्षियेला कृष्णनाथ ॥१८॥ कृष्णनाथ रुपें जहाला ब्राह्मण । वांचवीले प्राण अर्जुनाचे ॥१९॥ अर्जुनाचें सैन्य रोमावळी अंत । महानदी प्रांत उत्तरींलें ॥२०॥ उत्तरीलें येणें अर्जुनादिकांतें । गेले दुंदुभीतें वधावया ॥२१॥ वधावया गेले तेणें हुंडारिलें । सागरीं राखिलें मारुतीनें ॥२२॥ मारुतीचें बळ वर्णितां सबळ । वाचा हे विबळ होत आहे ॥२३॥ होत आहे साना होत आहे थोर ॥ कोण जाणे पार स्वरुपाचा ॥२४॥ रुप वज्रदेही पुच्छ वज्र तें हि । रामदासीं नाहीं जन्ममृत्यु ॥२५॥