नवरात्र माहिती

शारदीय अश्विन नवरात्र

यंदा दिनांक २२/०९/२०२५ रोजी सोमवार आश्विन शुल्क पक्ष प्रतिपदा पासुन श्रीघटस्थापना होत आहे …

पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस फार माजला होता. त्याने देवदेवता, ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना भयंकर त्रास देऊन अगदी सळो की पळो करून ठेवलं होतं. तो सर्वांचाच फार छळ करत असे , अन्याय करत असे .
तेव्हा सर्व देवता गण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या त्रिदेवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसाचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली. त्या शक्ती देवतेला सर्व देवणी आपापले तेज , आयुधे अस्त्र शस्त्रे दिली ..

त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी महिषासुर मर्दिनी असे नाव ठेवले. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.

अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असे म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची छान छान भजने, स्त्रोत्र म्हटली जातात.
आपल्या महाराष्ट्रात तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता, कोल्हापूरची अंबाबाई ( कोणा मते महालक्ष्मी ) ही तीन पूर्ण पिठे व वणीची सप्तश्रृंगी देवी ही अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. उत्सव असतो .. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठाचा किंवा गुळाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुख सौभाग्य समृद्धीचे वरदान मागतात.
१.शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.

नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.

घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी. आपल्या घरात जे देवी मूर्ती प्रतिमा असेल तिचे पूजन स्थापन करू शकतात ..

नवरात्र महोत्सवात आपापल्या कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील मृत्तिका म्हणजेच माती आणून तिचा जाड असा दोन बोटाच्या पेर एवढा जाड चौकोनी थर करावा आणि त्यात आपापल्या परंपरे प्रमाणे धान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत. कोणाकडे एक धान्य कोणाकडे दोन तर कोणाकडे तीन पाच सात वगैरे रिती परंपरा असते .

मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध / चंदन , फुले, दूर्वा, हळद , अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालून सप्त नद्या – तीर्थे – सागर वरुण यांचे स्मरण करून टाकावे.

त्यावर आपल्या परंपरे प्रमाणे नारळ किंवा तांदळाचे भरलेले ताम्हण ठेवणे .. ताम्हणात आपल्या घरातील कुलदेवता टाक किंवा मूर्ती किंवा जे काही देवीच्या मूर्ती असतील त्या म्हणजेच अन्नपूर्णा – लक्ष्मी – इत्यादी स्थापन करणे .. प्रथम त्या मूर्तींवर शास्त्रोक्त अभिषेक करून पूजन करून स्थापना करणे .. जर घटावर नारळ असेल तर त्याचे बाजूला एक ताम्हणात देवता स्थापन करू शकतात ..
बाजूलाच अखंड दीप स्थापन करणे .. दिव्याखाली एक ताम्हण किंवा डिश किंवा पत्रावळ असलेले उत्तम .. तेलात कापूर लवंग वेलची आदी सुगंधी पदार्थ टाकू शकतात..
नऊ दिवस प्रतिदिन किंवा जसे जमेल तसे त्या दिवशी कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते. रोज एक एक करून किंवा एकच दिवशी नऊ किंवा ज्या दिवशी जेवढ्या मिळतील तेवढ्या कुमारिका पूजन करून व सुहासिनी हळदीकुंकू पूजन करावे व त्या सर्वांना उपयोगी भेटवस्तू द्याव्या..

एकदा स्थापन केलेले देव – कलश – दिप हलवू नये..
रोज नवीन माळ अर्पण करावी.
फुले मात्र जुनी काढून रोज नवीन arpn करणे .. तसेच देवीला दिलेले फळ व पानाचा विडा सुद्धा रोज बदलावा व नवीन ठेवावे .. आधीचे फळ आपण स्वतः सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावे .. फक्त पहिल्या दिवसापासून उत्थापन पर्यंत माळ मात्र तशीच वाढत जाईल , जुनी माळ काढू नये .. रोज पेरलेल्या धान्याला जमिनीला थोडे जल देणे ..
देवी समोर प्रथम दिवशी साडी चोळी सौभाग्य वायन अलंकार व पंचा उपरणे ( टॉवेल ) ठेवावे नंतर ते ब्राह्मण गुरुजीस द्यावे .. किंवा नुसती साडी तरी ठेवावी ..
काही कारणाने दिवा विझला तर पुन्हा वात नीट करून लावणे , घाबरून जाऊ नये – चिंता करू नये ..
रोज देवीचे येत असलेले स्तोत्र भजन मंत्रजप म्हणावे .. देवी सहस्त्रनाम , ललिता सहस्त्र नाम , देवी कवच वगैरे स्तोत्राचे रोज नित्य पठण श्रवण उपासना करावी ..
शक्य असल्यास योग्य गुरुजींकडून नवचंडी हवन विधी करून घ्यावा .. किंवा निदान गुरुजींकडून शास्त्रोक्त रीतीने नऊ पाठ चंडिपाठ करून घ्यावेत .. ते पण शक्य नसेल तर तीन वेळा तरी म्हणजे पंचमी अष्टमी व कुलदेवता चा दिवस या तीन वेळा पाठ म्हणून घ्यावा किंवा निदान एक तरी दिवस शास्त्रोक्त विधियुक्त रीतीने तज्ज्ञ गुरुजींकडून एक चंडीपाठ म्हणून घ्यावा ..
आपल्या परंपरे प्रमाणे नवमी किंवा दसरा या दिवशी उत्थापन करावे .. पुरण खीर वगेरे नेवैद्य अर्पण करून पूजन करावे उपवास सोडावा ..
शरीराला त्रास होत असेल – गोळ्या औषध चालू असतील तर उपवास करू नये , उपवास पेक्षा उपासना महत्वाची व फलदायी असते .. तसेच स्त्रीवर्गाने मासिक अडचण पुढे जाणाऱ्या गोळ्या घेऊन शरीराला त्रास देऊ नये .. चुकून मासिक अडचण आलीच तर कोणा दुसऱ्याला दिव्यात टेक टाकायला सांगणे व देवीला दूध साखर किंवा फळ नेवैद्य अर्पण करायला सांगणे .. स्वतः कुठे स्पर्श करू नये ..
चुकून एक तीन दिवसाचे सुतक आले तरी सुद्धा दुसऱ्याकडून पूजन नेवैद्य करू शकतात .. व नंतर पुन्हा शुचिर्भूत होऊन उरलेले दिवशी स्वतः पूजन नेवैद्य करू शकतात .. जर मोठे जवळचे सुतक आले तर दुसऱ्याकडून विधिवत विसर्जन करून घ्यावे.

जे उपवास करत नाहीत त्यांनी रोज देवीला आपल्या भोजनाचा नेवैद्य अर्पण केल्यास चालेल व तो नेवैद्य स्वतः खावा .. मांसाहार टाळावा.. शुद्ध सात्विक शाकाहार असावा ..

नवरात्रीत काही जण घरातील देवांची पूजा करत नाहीत , तर ते अत्यंत चूक आहे अयोग्य आहे .. नवरात्रीत फक्त देवी स्थापना होते , त्यामुळे इतर देवता जसे गणपती बाळकृष्ण वगैरे जे असेल त्याची रोज नेहमीप्रमाणे पूजा करावी ..

काही ठिकाणी घटस्थापन नसते , नव्हतर नसते पण श्रद्धा समाधानासाठी फक्त अखंड दीप असतो , त्यांनी सुद्धा घरातील सर्व देवांची नेहमीप्रमाणे पूजन करणे ..

आपलाच धर्मसेवक 🚩
श्री श्याम जोशी गुरुजी ,
टिटवाळा मुंबई गोवा
8976663159

आदिशक्ती जगदंबा भवानी आपल्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करून सर्वांना सुख समृद्धी देवो ..

लेखकाचे नाव न खोडता वरील लेख माहिती इतर ठिकाणी पाठवण्यास हरकत नाही ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!