श्रीदत्तात्रेय स्तुती प्रार्थना

|| श्री दत्त स्तुती ||

श्रीदत्तराया गिरनार वासी |
अस्तित्व आहे गाणगापुरासी |
औदुंबरीही तुझी नित्य फेरी |
तुजवीण दत्ता मज कोण तारी ||१ ||

कषाय वस्त्रे जटाभार झोळी |
पायी खडावा शुभ्र भस्म भाळी |
शिरें तीन सहा हस्त शस्त्रधारी |
तुजवीण दत्ता मज कोण तारी ||२ ||

गोरूप भूमाय श्वानरुप वेद |
दुर्लक्षी माझे सहस्त्र प्रमाद |
शास्त्रे पुराणे तुझे भाट सारी |
तुजवीण दत्ता मज कोण तारी ||३ ||

ह्रदयी असावी तुझी मूर्ती देवा |
मनी हिच इच्छा घडो तुझी सेवा |
विरक्ती असावी असोनी संसारी |
तुजवीण दत्ता मज कोण तारी ||४ ||

भवदु:ख आता क्षणी दूर व्हावे |
आयुष्य आरोग्य सकळांसी द्यावे |
तव दर्शनाची मला आस भारी |
तुजवीण दत्ता मज कोण तारी ||५ ||

कृपा दृष्टी होता जळे पापराशी |
सदा सर्वदा सर्वही सौख्य देसी |
परब्रह्मरूपी गुरू मोक्षकारी |
तुजवीण दत्ता मज कोण तारी ||६ ||

दत्तगुरू जय दत्तगुरू हा |
महामंंत्र हृदयी सुरू असे पहा |
कैवारी माझा तू दंडधारी |
तुजवीण दत्ता मज कोण तारी ||७ ||

तुझा दास मी दीन दत्ता दयाळा |
मन:शांती लाभो मज विश्वपाळा |
धावून ये रे हो देहधारी |
तुजवीण दत्ता मज कोण तारी ||८ ||

एकांती ये रे गुरूदत्तराया |
इच्छित माझे वरदान द्याया |
विनंती पदी सर्व चिंता निवारी |
तुजवीण दत्ता मज कोण तारी ||९ ||

|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!