दीपपूजन दीपअमावास्या

दीप अमावस्या बद्दल माझा जुना ( माझा सात आठ वर्ष पूर्वीचा लेख ) आता अजून सुधारित केलेला लेख

हरि ॐ नमस्कार

मंगलमय दीपपूजन की लाजिरवाणी गटारी?

आषाढातील अमावस्या म्हणजेच दीप अमावास्या .
हल्ली या दिवसाला आपल्याला खरेतर लाज वाटावी इतकी विकृत कुप्रसिद्धी “गटारी” म्हणून मिळत आहे. जेव्हा आमच्या आजूबाजूची अमराठी माणसे ”गटारी” चा अर्थ विचारतात तेव्हा आमचेच काही मित्र “त्या दिवशी इतकी प्यायची की गटारात पडून गटारे फुल झाली पाहिजेत”,अशी फुशारकी मारतात. आपल्या समाजातील चांगल्या प्रथा एकमेकांना दाखविण्याच्या स्पर्धेच्या या दिवसात आम्ही मात्र अशा फुशारक्या मारतो. अमराठी लोकांना वाटते की काय यांचे हे गटारात पडायचे सण?

वास्तविक पूर्वी काही ठिकाणी — हा काळ देवांचा निजण्याचा काळ म्हणजेच शुभऊर्जा शुभतत्व कमी होण्याचा काळ असे मानून अशुभ शक्ती वाढायला नकोत म्हणून काही ठिकाणी त्यांच्या रीती परंपरे प्रमाणे प्राण्यांचा बळी दिला जायचा जेणेकरून अशुभ तत्व संतुष्ट होऊन त्रास देणार नाहीत.. हा एक धार्मिक मानसिक मुद्दा झाला .. तर काही ठिकाणी
मांसाहार करण्याची परंपरा सुरू झाली त्याठिकाणी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. ( अर्थात पूर्वी दर दीड दोन महिन्यातील एखाद ठराविक दिवस संपूर्ण नियमाप्रमाणे मांसाहार व्हायचा व तोही अगदी ठराविक थोडासाच त्यावेळेस ) .. खरेतर इतिहास निसर्ग याबाबतीत अधिक अभ्यास पाहता प्राण्यांची हत्या याकाळात निक्षून बंद असायची .. कारण-

१ ) हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.

२) जे काही अगदी थोडेजण मांसाहार करायचे ते सुद्धा या काळात म्हणजे जवळपास पूर्ण चार महिने मांसाहार टाळायचे कारण या कुंद पावसाळी वातावरणात थंडीच्या काळात वगैरे मांसाहार पचत नाही. अग्नि जास्त प्रदीप्त नसतो यामुळे …

३) बाहेरच्या या अशा रोगट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आणि शरीरावर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
त्यामुळे एकदा याला धार्मिक जोड दिली की अपोआपच निसर्गाचा समतोल साधला जातो.
आषाढ महिन्यात पावसाची रिपरिप चालू असते, जमीन आपले रूप बदलून हिरवाईने नटत असते, आपल्याला धरणीने भरभरून द्यावे. सततच्या पावसाने निर्माण झालेली रोगराई दूर जावी ही लोक मनाची भावना, गावामधून इडापीडा बाहेर काढण्यासाठी दृष्ट शक्तींना बळीचे आमिष देवून गावाचे सीमेबाहेर काढण्याचे विधी केले जातात. तसेच आपले रक्षण करावे म्हणून या काळात लोक गावातील ग्रामदेवतांची करूणा भक्तात. या देवताना नेवेद्य देऊन संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. अमावस्या हा महिन्यातील शेवटचा दिवस महिनाभरात राहिलेले सर्वच विधी या दिवशी पुर्ण केले जातात, आपल्या मागील सर्व पीडा जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावसेचे सायंकाळी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. या दिवशी पितळी दिवे, समया, निरांजनी, तांब्याचे दिपदानातले दिवे, लामणदिवे, कापूरवाती लावायच्या आरत्या अश्या सर्वांची पूजा केली जाते, संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं. रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे दिवे करायचे, आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे प्रज्वलित करून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला दिव्यांना नैवेद्य दाखवितात. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात, यांना महत्त्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्र्याची देवता निघुन जाते अशी कल्पना आहे.
अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. शाकाहारामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
पुढे ४ महिने साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांसाठी,पूजांसाठी तयारी म्हणून पूर्वी घरातून विविध दिवे शोधून ते साफसूफ करून या दिवशी अत्यंत भक्तिभावाने पूजले जात असत. आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून,अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण नैवेद्य दाखवतात.
अलीकडे या उत्सवाला एक नवीनच नाव लाभले आहे ते म्हणजे ‘गटारी अमावस्या ‘ आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद व अश्विन या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज मानला जातो. मग या सर्वाचे शोकीन आषाढ मधील हा दिवस पुन्हा काही दिवस हे सर्व मिळणार नाही म्हणून मद्यपान व मांसाहार याने साजरा करतात, तर काही बेधुंद झाल्याने गटारात लोळतात. म्हणून हे नाव मिळाले असावे. अंधारावर मात करून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उत्सव या पद्धतीने साजरा करणे अयोग्यच. खूप आनंददायी आणि मंगलमय अशा या सोहोळ्याची माध्यमांकडून दाखलच घेतली जात नाही. या उलट ४० टन चिकन-२० टन मटण—रोज १५/२० बोकड लागणार, दारूड्यांवर पोलिसांची नजर, अनेक हॉटेलात खास package अशा बातम्या चघळल्या जात आहेत. आपली उत्सवप्रियता पाहता आता यात DJ चा दणदणाट , प्रायोजकांच्या कमानी , चीअरगर्ल्सचा नाच इत्यादि गोष्टी फार लांब नाहीत.
शास्त्रीय कारण असलेल्या “गटारी”चे आपण लाजिरवाणे उदात्तीकरण करायचे की लाखो मराठी घरातील मंगलमय दीपपूजनाची लोकांना माहिती करून द्यायची ?… आपण हा निर्णय आता घ्यायलाच हवा.
आपणही या दिवशी आपल्या घरातील सर्व दिव्यांची जरूर पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपूया !
दीपज्योति: परब्रह्म दिपज्योतीर्जनार्दन:I
दीपोहरतु मे पापं दीपजोतिर्नमोस्तुते II

प्राचीन जुने बरोबरच आधुनिक नवीन दिवे म्हणजे led बल्ब लाईट , ट्यूब लाईट वगैरे जे दिवे असतील ते सुद्धा पुसून साफ स्वच्छ करावीत..
देवळात जाऊन एखादा दिवा ( पणती / पिठाचा कणकेचा ) प्रज्वलित करणे .. मनापासून दिव्याची म्हणजेच प्रकाशाची म्हणजेच एक प्रकारे आपल्या सर्वांच्या प्रकाशमय उज्वल भविष्याची प्रार्थना करावी ..

@© श्री श्याम जोशी गुरुजी ,
टिटवाळा मुंबई ..
( जुने लिखाण 25 जुलै 2015 )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!